चिपळूण : ऐन पावसाळ्यात महावितरण कंपनीकडून ग्राहकांना चांगली सेवा मिळत नाही. उलट आॅनलाईन तक्रार निवारण सेवा ग्राहकांच्या माथी मारुन ग्राहकांना त्रास देण्याच्या भूमिकेचा सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी निषेध करीत ही सेवा तत्काळ बंद करा, अशी मागणी आज (बुधवारी) केली. महावितरणच्या खेळखंडोब्यामुळे ग्राहकांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.गेल्या चार दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरु आहे. महावितरणच्या सुलतानशाही कारभाराला ग्राहक कंटाळले आहेत. सध्या मुस्लिम बांधवांचे रोजे सुरु आहेत. त्यातच पावसाळी वातावरण असल्याने विजेची नितांत गरज असते. परंतु, गेले चार दिवस दिवसातून १० ते १२ वेळा वीजपुरवठा खंडित केला जातो. काही भागात रात्रीही वीजपुरवठा खंडित असतो. त्यामुळे ग्राहकांची गैरसोय होत आहे. या बेबंदशाही कारभाराला कंटाळून अखेर सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयावर धडक देऊन जाब विचारण्याचा निर्णय घेतला. महावितरण कंपनीने ग्राहकांसाठी आॅनलाईन तक्रार निवारण सेवा सुरु केली आहे. हा द्रविडीप्राणायम कारभार ग्राहकाच्या हिताचा नाही. त्यामुळे सेवा मिळण्याऐवजी गैरसोयच अधिक होत आहे. ही प्रक्रिया किचकट असल्याने आज सकाळी माजी सभापती शौकत मुकादम, उपनगराध्यक्ष लियाकत शाह, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष उदय ओतारी, काँग्रेसचे शहराध्यक्ष परिमल भोसले, मनसेचे तालुकाध्यक्ष संतोष नलावडे, मनसेचे शहराध्यक्ष कपिल शिर्के, वैभव वीरकर, इनायत मुकादम, फैसल पिलपिले, प्रफुल्ल पिसे, साधना कात्रे, वीणा कानडे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयावर धडक देऊन कार्यकारी अभियंता मकरंद आवळेकर यांना भंडावून सोडले. कार्यकर्त्यांनी आपल्या विविध समस्या मांडल्या. प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. महावितरणच्या सेवेचा बोजवारा उडाला आहे. परंतु, महावितरण कंपनी ग्राहकांकडून दामदुप्पट देयके जमा करीत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. उपनगराध्यक्ष शाह यांनी आवळेकर यांना निवेदन देऊन आॅनलाईन तक्रार निवारण सेवा तत्काळ बंद करण्याची मागणी केली. ही सेवा ग्राहकांसाठी डोकेदुखी ठरणारी आणि तापदायक आहे. तक्रार निवारणासाठी असलेला टोल फ्री क्रमांक मुंबई, पुणे येथील आहे. एखाद्या व्यक्तीच्या घरात शॉर्टसर्किट झाले तर तक्रार मुंबईत करायची काय? हा अजब कारभार वीज ग्राहकांना सोयीचा न होता मनस्ताप देणारा ठरला आहे. तक्रारीनंतर वीज पुरवठा सुरळीत होण्यास १६ ते १७ तास कालावधी लागतो. त्यामुळे ही व्यवस्था बंद करावी अन्यथा जनआंदोलन छेडावे लागेल, असा इशारा शाह यांनी दिला. (प्रतिनिधी)
सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांचा महावितरणवर मोर्चा
By admin | Published: July 16, 2014 10:34 PM