रत्नागिरी : शहरातील गाडीतळ येथील एका शेडमध्ये खूप दिवसापासून राहत असलेल्या निराधार व्यक्तीला माहेर संस्थेचे अधीक्षक सुनील कांबळे यांच्या प्रयत्नामुळे लाॅकडाऊन काळात आधार मिळाला आहे.
रत्नागिरी येथील गाडीतळावर एका शेडमध्ये खूप दिवसापासून एक बेवारस व्यक्ती राहत असल्याची बातमी माहेर संस्थेचे अधीक्षक, सुनील कांबळे यांना कळली. त्यांनी बातमीची शहानिशा करण्यासाठी गाडीतळ येथे जाऊन पाहणी केली. त्यावेळी ४० ते ५० वयोगटातील एक व्यक्ती अतिशय वाईट अवस्थेत एका शेडमध्ये झोपल्याचे त्यांना दिसले. त्याच्या अंगावर मळलेले कपडे होते. त्याला नीट बसता, चालता येत नव्हते. खूप दिवस त्याने आंघोळही केली नव्हती. खूप दिवसापासून ही व्यक्ती गाडीतळावर या अवस्थेत राहत असून भीक मागून मिळेल ते खात होती. लॉकडाऊनच्या काळात अन्न-पाण्यावाचून त्या शेडमध्ये झोपत होती. वादळवाऱ्यात, पावसात खूप भिजल्याने तब्येतही बिघडली होती. शेडमध्ये अगदी दुर्गंधीयुक्त वातावरणात राहत असल्याने अशा परिस्थितीत त्याला आसरा देणे गरजेचे होते.
औषधोपचाराची गरज ओळखून त्या बेघर व्यक्तीला खेडशी येथील माहेर संस्थेच्या निराधार पुरुषांच्या आश्रमात दाखल करण्याचा निर्णय सुनील कांबळे यांनी घेतला व त्याला तत्काळ संस्थेत आणले. कोरोनाच्या या काळात या बेघर व्यक्तीला माहेर संस्थेने वेळीच आधार देऊन मानवता हाच खरा धर्म आहे हे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे.