रत्नागिरी : शहरानजीकच्या हातखंबा व कारवांचीवाडी येथील निराधारांचा आधार ठरलेल्या ‘माहेर’ संस्थेमुळे मानसिक आजारातून बाहेर पडलेल्या योगेश आणि रोजी यांना आयुष्याचा जोडीदार मिळाला.
माहेर संस्थेत अनाथ, निराधार मुले, मुली, महिला, पुरुष दाखल होत असतात. त्यांना प्रेम, आपुलकी, माया संस्थेकडून मिळतेच, तसेच शिक्षण-प्रशिक्षण, पालन-पोषण व पुनर्वसन संस्था पार पाडत असते. संस्थेत दाखल झालेल्या निराधारांच्या इच्छेनुसार विवाह लावूनही त्यांचे पुनर्वसन करत असते. असाच एक मनाला भावणारा विवाह माहेर संस्था पुणे येथे पार पडला. संस्थेच्या कारवांचीवाडी येथे चार वर्षांपूर्वी योगेश परब मानसिक रुग्ण असल्याने दाखल झाला होता. तरुणपणातच आईवडील वारल्याने त्याच्या मनावर विपरित परिणाम झाला होता. गावामध्ये एकटाच फिरायचा. मानसिक रुग्ण असल्याने त्याला कामही कोणी देत नव्हते. त्याला दोन भाऊ असून, ते मुंबई येथे स्थिरस्थावर आहेत, परंतु योगेशला सांभाळणे त्यांना कठीण होऊन बसले होते. त्याची अडचण लक्षात घेऊन, माहेर संस्थेने योगेशला दाखल करून घेतले. मनोरुग्णालयातील औषधोपचारामुळे तो बरा झाला. त्याने लग्न करण्याची इच्छा संस्थेचे अधीक्षक सुनील कांबळे यांना बोलून दाखविली. संस्थेच्या संस्थापिका संचालिका सिस्टर लुसी कुरियन याही माहेर पुणे येथील निराधार रोजी फरीदसाठी मुलाच्या शोधात होत्या. ती भिक्षेकरी गृहातून संस्थेच्या वडू (पुणे) या संस्थेत दाखल झाली होती. ऐन तारुण्यात तिच्याही मनावर परिणाम झाला होता, परंतु संस्थेच्या उपचारांनी ती बरी झाली. तिलाही लग्न करण्याची इच्छा होती. तशी इच्छा तिने सिस्टर लुसी कुरियन यांच्याकडे बोलून दाखवली होती. लुसी कुरियन आणि सुनील कांबळे यांनी योगेश व रोजी यांची माहेर संस्था पुणे येथे भेट घडविली. दोघांनी एकमेकाला पसंत केले.
अखेर हा विवाह वढू बुद्रुक येथे मोठ्या थाटामाटात संस्थेच्या संस्थापिका संचालिका सिस्टर लुसी कुरियन व माहेर संस्थेच्या अध्यक्षा हिरा बेगम मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच येथील संस्थेचे अधीक्षक सुनील कांबळे, मीरा गायकवाड यांच्या उपस्थितीत कोरोनाचे नियम पाळत पार पडला. या विवाहाला माहेर संस्था पुणे व रत्नागिरीतील सर्व कर्मचारी व प्रवेशित हजर होते.
औषधोपचाराने व संस्थेच्या प्रेमाने बऱ्या झालेल्या योगेश व रोजीची विवाहाची इच्छा संस्थेने पूर्ण केली. या विवाह प्रसंगी त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता.