रत्नागिरी : जिल्हा प्रशासनातील महिला अधिकाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. आधी पाच महिला अधिकारी कार्यरत होत्या. त्यापैकी दोघींची बदली झाली असून, तीन नव्या महिला अधिकाऱ्यांची भर पडली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सामान्य प्रशासनाच्या उपजिल्हाधिकारी राजश्री मोरे, कोकण रेल्वे भूसंपादनच्या ऐश्वर्या काळुसे, भूसंपादन विभागाच्या सविता लष्करे आणि रोजगार हमी योजनेच्या उपजिल्हाधिकारी अमिता तळेकर यांच्या एकाचवेळी रत्नागिरीत नियुक्ती झाल्या. त्याआधी जिल्हा प्रकल्प अधिकारी (नगरपंचायत विभाग) शिल्पा नाईक, तसेच महसूल विभागाच्या तहसीलदार वैशाली पाटील अशा एकूण पाच महिला अधिकारी कार्यरत होत्या.
काही महिन्यांपूर्वी जिल्हा प्रकल्प अधिकारी शिल्पा नाईक यांची इतरत्र बदली झाली असून, उपजिल्हाधिकारी राजश्री मोरे यांचीही प्रशासकीय बदली झाली आहे. त्यांच्या जागी सिंधुदुर्गच्या निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांची नियुक्ती झाली आहे. त्याचबरोबर उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुशांत बनसोडे यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी बदलीने नियुक्त झालेल्या रोहिणी रजपूत यांची पुन्हा जिल्हा पुरवठा अधिकारी महेश पाटील यांच्या बदलीने रिक्त झालेल्या या पदावर नियुक्ती झाली आहे.
तसेच जिल्हा प्रशासनाच्या महसूल विभागाच्या तहसीलदार वैशाली पाटील यांच्या बदलीमुळे रिक्त झालेल्या या पदावर तेजस्विनी पाटील यांची नियुक्ती झाली आहे.
त्यामुळे आता जिल्हाधिकारी यांच्या प्रशासनात कोकण रेल्वे भूसंपादनच्या ऐश्वर्या काळुसे, भूसंपादन विभागाच्या सविता लष्करे आणि रोजगार हमी योजनेच्या उपजिल्हाधिकारी अमिता तळेकर, सामान्य प्रशासनाच्या उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी राजपूत आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल विभागाच्या तहसीलदार तेजस्विनी पाटील अशा सहा महिला अधिकारी स्वतंत्र विभाग सांभाळत आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनात खऱ्या अर्थाने महिलाराज आले असल्याचे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
जिल्हा परिषदेतही महिलाराज
जिल्हा परिषदेची धुरा मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. इंदुराणी जाखड या सांभाळत आहेत. त्याचबरोबर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प अधिकारी नंदिनी घाणेकर, तसेच माध्यमिकबरोबरच प्राथमिक शिक्षण विभागाची धुरा शिक्षणाधिकारी निशादेवी वाघमोडे या महिला अधिकारी सक्षमपणे सांभाळत आहेत.