लांजा (जि. रत्नागिरी) : कोंबड्यांवर ताव मारण्यासाठी घराच्या मागील खोलीत घुसलेल्या बिबट्याला धाडसी मायलेकींनी दरवाजा बंद करुन कैद केले. रात्रभर खोलीत कैद झालेल्या या बिबट्याला वनविभागाच्या कर्मचाºयांनी सोमवारी सकाळी पिंजºयात जेरबंद करुन जंगलात सोडून दिले. लांजा तालुक्यातील भांबेड दैतवाडी येथे ही थरारक घटना घडली.सुषमा सोमा शिवगण (वय ३५) व स्वाती सोमा शिवगण ( २०) अशी मायलेकींची नावे आहेत. सुषमा यांचे पती सोमा गंगाराम शिवगण हे कामानिमित्त मुंबई येथे असतात. रविवारी रात्री साडेअकराच्यादरम्यान दोघी झोपण्याच्या तयारीत असताना घराच्या मागे असलेल्या पडवीत (खोलीत) कोंबड्यांचा मोठ्याने ओरडण्याचा आवाज येऊ लागला.या दोघी पाहण्यासाठी गेल्या असता त्यांना बिबट्या दिसला. त्यानंतर धाडस करुन त्यांनी खोलीचा दरवाजा बंद केल्यामुळे बिबट्या कैद झाला.यानंतर दोघींनी परिसरातील लोकांना माहिती दिली. ग्रामस्थांनी वनविभागाला कळविले. सकाळी दहाला खोलीच्या भिंतीला भगदाड पाडून बिबट्याला पिंजºयात जेरबंद करण्यात आले.कोंबड्या खाण्यासाठीच बिबट्या घरात...पकडण्यात आलेला मादी बिबट्या आहे. त्याचे वय ४ वर्षे असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले. कोंबड्यांना खाण्यासाठीच बिबट्या खोलीत शिरला होता. मात्र खोलीचा दरवाजा बंद केला गेल्याने तो कैद झाला. त्याने दोन कोंबड्या फस्त केल्या. मात्र लोकांचा जमाव रात्रभर खोलीबाहेर असल्याने घाबरलेल्या अवस्थेत तो एका कोपºयात बसून होता.
घरात घुसलेल्या बिबट्याला मायलेकींनी केले कैद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2018 5:10 AM