खेड : खेड शहरातील जुम्मा मस्जिद, सफा मस्जिदसह अन्य चार संस्थांच्या विश्वस्तांमधील वादातून नवीन व्यवस्थापनांसाठी केलेला अर्ज औरंगाबाद येथील महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाने फेटाळला आहे़ या निकालानुसार दोन्ही बाजूंना कारभारात हस्तक्षेप करण्यास मनाई करण्यात आली असून, देखरेखीचे अधिकार कोकण विभाग प्रादेशिक वक्फ अधिकारी यांचेकडे सोपवण्यात आले आहेत. कोकण विभाग प्रादेशिक वक्फ अधिकारी यांची संस्थेवर निवड करण्याचा आदेश ६ मे रोजी राज्य वक्फ मंडळाने पारीत केला आहे़खेड शहरातील जुम्मा व सफा मस्जिद वगैरे अन्य संस्थांची स्थापना मुंबई सार्वजनिक विश्वस्त अधिनियम तरतुदीनुसार झाली असून, या संस्थेत १६ नोव्हेंबर २०१४ व २८ एप्रिल २०१५ रोजी संस्थेची निवडणूक घेण्यात आली़ या निवडणुकीत अध्यक्ष अब्दुल कादीर म़ इसहाक पोत्रिक, उपाध्यक्ष अब्दुल वहाब, युसूफ कावलेकर, सचिव अब्दुल अजिज महमद हुसैन मणियार, खजिनदार अब्दुल कादीर इस्माईल मुल्लाजी आणि सदस्यपदी खलिल म.़ पोफळणकर, फारूख हमजा मणियार, इरफान उमर खेडेकर, शमसुददीन शेख अली जुईकर, अहमद अब्दुल करीम मुकादम, हसनमियाँ जमालुद्दीन मुसा व अब्दुल्ला मुल्लाजी यांची निवड करण्यात आली़ या निवडीनंतर संस्थेचे अहमद अब्दुल करीम मुकादम, हसनमियाँ जमालुद्दीन मुसा हे बैठकीला उपस्थित नसताना आणि नामनिर्देशन पत्र न भरता ही निवड कशी काय करण्यात आली तसेच वक्फ बोर्डाचा अधिकारी हजर नसताना ही निवडणूक घेण्यात आली असे दोन आक्षेप नोंदवले गेले होते़ त्यानंतर हे प्रकरण औरंगाबाद येथील महाराष्ट्र वक्फ मंडळाकडे दाखल करण्यात आले होते. वक्फ मंडळाच्या प्रमुख कार्यकारी अधिकारी नसीमबानू नजीर पटेल यांच्यासमोर दोन्ही बाजू मांडण्यात आल्या़ दोन्ही बाजूंची पडताळणी करण्यात आली़ त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. (प्रतिनिधी)
जुम्मा मशिदीची देखरेख वक्फकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2016 11:50 PM