खेड : तालुक्यातील प्रमुख मार्गावरील सर्वच रस्ते खड्ड्यात गेले आहेत. या खड्ड्यांमुळेच येथे कधीतरी रस्ते होते, याविषयी सांगणे कठीण झाले आहे. नव्याने डागडुजी करण्याची मागणी लोकप्रतिनिधींच्या कात्रीत अडकून राहिल्याने रस्त्यांची दुरवस्था पाहावेनाशी झाली आहे़ खेड तालुक्यातील हे रस्ते जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीचे आहेत. या खड्ड्यांमुळे वाहने व प्रवासी यांना त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याची दुरूस्ती तेथील लोकप्रतिनिधींच्या हातात असून, त्यांनी दुर्लक्ष केल्यास या रस्त्यांची दुरूस्ती रखडते. मात्र, हे सारे गणित राजकीय साठमारीत अडकले आहे. येथे निवडणुकीतील गणिते मांडली जात आहेत. रस्त्यांच्या प्रस्तावाला लोकप्रतिनिधींकडून केराची टोपली दाखविली जाते़ या साऱ्या प्रकाराबाबत त्या त्या भागातील ग्रामस्थ कंटाळले आहेत. भरणे नाका ते आंबवली-वडगाव मार्गावरील रस्त्याची दुर्दशा झाली आहे. गेली काही वर्षे या रस्त्याच्या डागडुजीकरिता एकाही लोकप्रतिनिधींकडून प्रयत्न करण्यात आले नाहीत़ सुमारे ४२ गावांतील जनतेसाठी हा मार्ग सोयीचा आहे. डोंगराळ भागातून जाणारा हा मार्ग दळणवळणाच्या दृष्टीने परिपूर्ण व्हावा, याकरिता आजवर एकानेही आपला आमदारकीचा निधी तसेच जिल्हा परिषदेचा निधी खर्ची पाडला नाही. खेड तालुक्यातील दोन प्रमुख रस्ते या भागातील गावांना जोडण्यात आले आहेत. १९६५ मध्ये हे रस्ते बांधण्यात आले होते. त्यांचे आयुर्मान संपले असल्याचे सागंण्यात येत असल्याने या रस्त्यांची डागडुजी करण्यासाठी पक्षीय अभिनिवेश बाजुला ठेवून दुरूस्ती करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. खेड तालुक्यातील बराचसा भाग सूर्यकांत दळवी व रामदास कदम यांच्या मतदारसंघात होता. मात्र, तेथील विकास ठप्प झाला आहे. या रस्त्याच्या डबघाईला दोन पक्षप्रमुखांमधील मतभेद कारणीभूत असल्याचे पुढे येत आहे. खाडीपट्टा, कर्जी, संगलट या परिसरातील रस्ते बिकट झाले आहेत. माजी मंत्री व आमदार भास्कर जाधव यांच्या मतदार संघातील रस्त्यांचीही अवस्था बिकट आहे. एक वर्षानंतर का होईना रस्ते डागडुजीकरिता जाधव यांनी लक्ष घातले आहे. आमदार संजय कदम व भास्कर जाधव या दोघांनाही याचा फायदा झाल्याचे निकालानंतर स्पष्ट झाले. पंधरा गाव धामणंद विभागातील रस्तेही उखडले असून, जाधव यांनी या रस्त्याला आता चालना दिली आहे. खेड तालुक्यातील रस्ते सुधारण्याकडे आमदार जाधव यांनी लक्ष घातले आहे. संपूर्ण तालुक्याचा कायापालट झाल्यास पर्यटकांनाही या भागात येणे सोयीचे होईल, असे सांगण्यात आले. या परिसरात खेड तालुक्यातील अनेक गावे संजय कदम व भास्कर जाधव यांच्या मतदारसंघात येत आहेत. त्यामुळे दोन्ही आमदारांना यात लक्ष घालावे लागणार आहे. (प्रतिनिधी)
प्रमुख रस्ते अडकले राजकीय संघर्षात
By admin | Published: December 23, 2014 9:58 PM