रत्नागिरी : शबरीमला मंदिरातील धर्मपरंपरांचे रक्षण करण्यासाठी केंद्र सरकारने संसदेत कायदा करावा आणि आंदोलक भक्तांवरील गुन्हे त्वरित मागे घ्यावेत आणि अन्य मागण्यांना अनुसरून राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या छत्राखाली हिंदूत्वनिष्ठ संघटनांनी रत्नागिरी शहरातील जयस्तंभ येथे निदर्शने केली होती.या आंदोलनात हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान, राजापूरचे संस्थापक अध्यक्ष महेश मयेकर, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सुशील कदम, शिवस्मृती मंडळाचे खजिनदार अविनाश पाटणकर, हिंदुत्वनिष्ठ बापूसाहेब पाटील, रणरागिणी शाखेच्या माधवी गुडेकर, महेश लाड सहभागी झाले होते.केरळमधील शबरीमला मंदिरात सर्व वयोगटांतील महिलांना प्रवेश देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. या निर्णयाविरोधात भगवान अय्यप्पा यांच्या भक्तांनी मंदिराच्या परंपरा रक्षणार्थ मोर्चे, आंदोलने आदी वैध मार्गाने निषेध नोंदवला. या आंदोनलकर्त्या भक्तांवरही गुन्हा नोंद करून त्यांना अटक करण्यात आली आहे.
या आंदोलनकर्त्या भक्तांवरील गुन्हे मागे घ्यावेत आणि त्यांना त्वरित मुक्त करण्यात यावे, तसेच केवळ शबरीमालाच नव्हे, तर ज्या ठिकाणी हिंदूंच्या श्रद्धा आहेत, त्याठिकाणी शासन किंवा न्यायालय यांनी हस्तक्षेप करू नये, असा कायदा संसदेत पारित करण्याची आवश्यकता आहे, असे मत यावेळी हिंदू जनजागृतीचे प्रसाद म्हैसकर यांनी व्यक्त केले.नाताळ आणि नवीन वर्षासाठी रात्री ११.५५ ते १२.३० यावेळेत फटाके फोडण्यास अनुमती दिली आहे. भारतात २० टक्के जतनेला दोन वेळेचे पुरेसे अन्न मिळत नाही, प्यायला पाणी मिळत नाही, शेतीसाठी पाणी नाही, कुपोषण, जनतेची निरक्षरता आणि अनेकांना औषधोपचारांचीही सोय नाही.
अशा स्थितीत नागरिकांनी फटाके उडवणे योग्य नाही. फटाके उडवणे हा पैशांचा अपव्यय होय. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन करत २५ डिसेंबर २०१८ ते १ जानेवारी २०१९ या कालावधीत फटाके फोडण्यास आणि चिनी बनावटीच्या फटाक्यांवर बंदी घालावी, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीचे विनोद गादीकर यांनी केली.पुरोगाम्यांच्या हत्यांमध्ये हिंदुत्वनिष्ठ संघटनांचाच हात आहे, असे गृहीत धरून सर्व अन्वेषण सुरू आहे. यामुळे सनातन संस्थेचे साधक, हिंदू जनजागृती समितीचे कार्यकर्त्यांसह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते यांना नाहक गोवून अधिकाधिक पोलीस कोठडी मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे न्यायालयात हे खटले लवकर चालवावेत आणि सत्य समोर आणावे, अशी मागणी सनातन संस्थेचे परेश गुजराथी यांनी केली.