लाेकमत न्यूज नेटवर्क
लांजा : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम रखडल्याने शहरात अर्धवट काम करण्यात आले आहे. त्यामुळे पावसाचे पाणी शहरातील घरे व दुकानामध्ये शिरण्याची शक्यता तसेच महामार्गावरील आंजणारी, वेरळ, देवधे फाटा, बोरथडे, वाकेड, वहरातील कोर्ले फाटा येथील नागरिकांना ये-जा करण्यासाठी अंडरग्राऊंड मार्ग करण्याच्या सूचना खासदार विनायक राऊत यांनी अधिकारी व ठेकेदार यांना दिल्या आहेत.
मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम यावर्षीही रखडले आहे. या रखडलेल्या कामाची खासदार विनायक राऊत यांनी पाहणी केली. चाैपदरीकरणाच्या कामसाठी वाकेड ते मठ महामार्गावर अनेक ठिकाणी खोदाई करण्यात आली आहे. तसेच वाकेड, आंजणारी येथील डोंगर कापल्याने पडणाऱ्या पावसाचे चिखलयुक्त पाणी आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. महामार्गावर अनेक ठिकाणी मोऱ्या व भराव टाकण्यात आल्याने पावसामध्ये मोऱ्या खचण्याची तसेच एका बाजूला भराव टाकून तयार करण्यात आलेला मार्गावरील चिखल माती रस्त्यावर येऊन अपघात होण्याची शक्यता आहे.
त्यानंतर लांजा शासकीय विश्रामगृह येथे अधिकारी, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि ठेकेदार यांची संयुक्त बैठक खासदार विनायक राऊत यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी आमदार राजन साळवी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विलास चाळके, उद्योजक किरण सामंत, तसेच लांजा तहसीलदार समाधान गायकवाड, प्रांताधिकारी पोपट ओमासे, जयवंत शेट्ये, लांजा नगराध्यक्ष मनोहर बाईत, मुंबई-गोवा महामार्ग विभागाचे अधिकारी शुक्ला, तोतेजा तसेच महामार्ग बांधकाम कंपनीचे अधिकारी शितलानी आणि प्रोजेक्ट मॅनेजर डी. एस. पटेल उपस्थित होते.
———————————
अनेक जण माेबदल्याच्या प्रतीक्षेत
लांजा शहरातील मुंबई-गोवा महामार्गाचे तातडीने काम करून तो वाहतूक योग्य होईल असा तयार करा, अशा सूचना दिल्या. तसेच महामार्गासाठी अधिग्रहण करण्यात आलेल्या शहरातील अनेक नागरिकांच्या जागांचा मोबदला अद्यापही देण्यात आलेले नाहीत. तसेच कुवे येथील नागरिकांच्या जागांचे वाढीव मूल्यांकन देण्यात यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.