चिपळूण : आजकालच्या विद्यार्थी वर्गासाठी वन्यजीवांचे संरक्षण हा त्यांच्या शालेय जीवनातील संस्कार बनावा आणि त्यातून भविष्यात अभ्यासू निसर्ग विषयक कार्यकर्ते तयार व्हावेत व हीच काळाची गरज आहे, असे प्रतिपादन विभागीय वन अधिकारी विकास जगताप यांनी केले.तिवडी येथे सह्याद्री विकास समिती आणि वन विभागाने आयोजित केलेल्या ‘निसर्गरंग’ या निसर्ग शिबिराच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. भल्या पहाटे चिपळूणमधील विद्यार्थी कोयना अभयारण्यालगत असलेल्या चिपळूण तालुक्यातील तिवडी या उत्तुंग ठिकाणी पोहोचले आणि त्यानंतर चार गटांमध्ये विभागून या विद्यार्थ्यांनी वन्यजीवांचा वावर असलेल्या जंगलातून दोन तास भ्रमंती केली. त्यानंतर पत्रकार योगेश बांडागळे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी सह्याद्री विकास समितीचे अध्यक्ष प्रकाश पवार, सचिव योगेश भागवत, चिपळूणचे वनक्षेत्रपाल गोविंंदराव कोले, तिवडीचे सरपंच रघुनाथ लांबे उपस्थित होते. प्रास्ताविक सचिव योगेश भागवत यांनी केले. शिबिराला मिळालेल्या प्रचंड प्रतिसदाबद्दल त्यांनी सर्व निसर्गप्रेमी विद्यार्थांचे अभिनंदन करून आपला अफाट सह्याद्री आणि येथील वन्य जीवनाचा अनुभव आपले आयुष्य समृद्ध करतो, असे सांगून निसर्गकार्यासाठी कार्य करण्याचे आवाहन केले. यावेळी सहभागी शिबिरार्थी विद्यार्थ्यांनी सह्याद्रीतील वन बांधवांशी संवाद साधला. त्यांचे जंगल व वन्यप्राण्यांचे अनुभव ऐकून विद्यार्थी भारावले. यानंतर विविध शाळांच्या संघामध्ये निसर्ग आणि वन्यजीवन विषयक प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये एस. पी. एम., परशुराम शाळा विजेती आणि सती हायस्कूल उपविजेते ठरले. यावेळी बक्षीसपात्र शालेय संघांना चषक आणि विद्यार्थ्यांना निसर्गविषयक पुस्तके व प्रशस्तिपत्रके देण्यात आली. देवरुख येथील जेष्ठ निसर्गप्रेमी सुरेंद्र माने आणि विभागीय वन अधिकारी विकास जगताप यांच्या उपस्थितीमध्ये शिबिराच्या समारोप करण्यात आला. जेष्ठ निसर्गप्रेमी सुरेंद्र माने यांनी यावेळी मनोगत व्यक्त गेले.या शिबिराचे संचालन संस्थेचे महाविद्यालयीन विद्यार्थीप्रमुख अक्षय सोलकर यांनी केले. तर विविध सत्रांचे संचालन शिबिरप्रमुख विकास कदम यांनी केले. प्रश्नमंजुषा कार्यक्रमाचे संचालन संस्थेचे संचित पेडामकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तिवडीतील संस्थेचे सर्व कार्यकर्ते आणि ग्रामस्थ प्रतीक पवार, सतीश पवार, अक्षय पवार, वन विभागाचे सर्व वनपाल, वनरक्षक आदी कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली. या शिबिराला चिपळूण परिसरातील विविध शाळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. (प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांसाठी वन्यजीव संरक्षण हा संस्कार बनावा
By admin | Published: October 06, 2016 10:13 PM