लाेकमत न्यूज नेटवर्क
देवरुख : मुसळधार पावसामुळे तालुक्यातील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने संगमेश्वर बाजारपेठ, माखजन आणि फुणगूस बाजारपेठेत पुराचे पाणी शिरले असून, घरांमध्ये पुराचे पाणी घुसले आहे. संगमेश्वर - देवरुख मार्गावर पाणी आल्याने वाहतूक ठप्प होती तर राष्ट्रीय महामार्गावरील ब्रिटीशकालीन बावनदी पूलही वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. कासारकोळवण आणि निवधेतील पूल वाहून गेले असून, आंबा घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
अतिवृष्टीमुळे बावनदीला पूर आला असून, पुढील आदेश येईपर्यंत या पुलावरून वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. बावनदीच्या पाण्यामुळे तालुक्यातील निवधे फूट ब्रीज (लोखंडी) वाहून गेला आहे. त्यामुळे निवधे गावाचा संपर्क तुटला आहे. त्याबरोबरच आंगवली आणि कासारकोळवणला जोडणारा कासारकोळवणच्या बाजूचा पूल वाहून गेला आहे. तसेच कळंबस्ते - अंत्रवली पूल, कोळंबे - परचुरी पूल आणि नायरी - निवळी पूल पाण्याखाली गेले होते. कसबा मार्ग तसेच संगमेश्वर - देवरुख मार्गावर लोवले, मयूरबाग आणि बुरंबी गेल्ये याठिकाणी सात ते आठ फूट पाणी गुरुवारी सकाळपासून होते. त्यामुळे हा मार्गही काही तास वाहतुकीसाठी बंद होता.
तालुक्यातील कासे, पेढांबे, असावे, धामापूर, करजुवे, कळंबुशी मार्ग पाण्यामुळे बंद होते. गडगडी, सोनवी नद्यांच्या पुरामुळे बुरंबी परिसरातील भातशेती पाण्याखाली गेली आहे. शास्त्री नदीमुळे संगमेश्वर बाजारपेठ पाण्यात गेल्याने काही व्यापारी पुराच्या पाण्यात अडकले होते. त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. तर सोनवडे सोनारवाडी येथे पुराच्या पाण्यात अडकलेल्यांना देवरुखच्या राजू काकडे हेल्प ॲकॅडमीच्या कार्यकर्त्यांनी सुखरूप बाहेर काढले.
पावसाच्या रौद्ररूपाचा तालुकावासीयांना फटका बसला आहे. अनेक बसेसही बंद करण्यात आल्या होत्या. तालुक्यात काही ठिकाणी विद्युत पुरवठा सुरळीत होता. मात्र, मोबाईलचे नेटवर्क गायब होते.