रत्नागिरी : जिल्हा हिवताप कार्यालयातील कायमस्वरूपी नोकरीतून डावलले गेलेल्या दहा कर्मचाऱ्यांनी १५ ऑगस्ट रोजी कुटुंबासह आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत भरती प्रक्रियेतून या हंगामी कर्मचाऱ्यांना १९९९ सालापासून कार्यरत असूनही त्यांना आता डावलण्यात आले आहे.
ऑनलाईन स्पर्धा
सावर्डे : चित्रकार, शिल्पकार सदानंद बाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून सावर्डे येथील सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट महाविद्यालयातर्फे ऑनलाईन चित्र, शिल्प, ग्राफीक, निबंध स्पर्धा तसेच राज्यस्तरीय निसर्ग स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी १४ ऑगस्टपर्यंत प्रवेशिका स्वीकारल्या जाणार आहेत. ही स्पर्धा विनामूल्य आहे.
तीन दिवस कार्यालये बंद
रत्नागिरी : शासकीय, निमशासकीय कार्यालये शनिवार ते सोमवार अशी तीन दिवस बंद रहाणार आहेत. सध्या शनिवारीही सर्व शासकीय कार्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. तसेच सोमवारी पतेतीची राष्ट्रीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मात्र यावेळी १५ ऑगस्ट रविवारी सुटीच्या दिवशी आला आहे. मात्र तीन दिवस शासकीय कार्यालये बंद रहाणार आहेत.
कोरवी यांची बदली
दापोली : दापोलीचे नायब तहसीलदार शंकर कोरवी यांची ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथे नुकतीच बदली झाली आहे. २०१५ साली दापोलीचे निवासी नायब तहसीलदार म्हणून कोरवी हजर झाले होते. २०१६ मध्ये त्यांची बदली दापोली प्रांत कार्यालयात झाली होती. आता त्यांची महसूल विभागाचे नायब तहसीलदार म्हणून मुरबाड येथे बदली झाली आहे.
काँग्रेस सेवादलातर्फे मदत
देवरु : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादलातर्फे डोंबिवली, कल्याण, ठाणे, बदलापूर, पनवेल या ठिकाणातून चिपळूण पूरग्रस्तांना किराणा किटचे वाटप करण्यात आले. खेर्डी माळेवाडी, सतीश शंकरवाडी, मुरादपूर, गोवळकोट आदी ठिकाणी हे वाटप करण्यात आले. काँग्रेसच्या प्रदेश महिला उपाध्यक्ष शुभांगी बेलवलकर नीलिमा शिंदे आदी यावेळी उपस्थित होते.