शिरगाव : कत्तलीकरिता जनावरे कऱ्हाडला घेऊन जाणाऱ्या शिरगाव येथील नीलेश चव्हाण या तरुणाला खेर्डीतील मुबारक खेरटकर व इक्बाल खेरटकर यांनी कुंभार्ली घाटात पकडून अलोरे - शिरगाव पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी बोलेरो गाडीतून विनापरवाना जनावरांची वाहतूक करणाऱ्या नीलेश चव्हाण याला अटक केली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कऱ्हाड - चिपळूण मार्गावर कुंभार्ली घाटात मोठ्या प्रमाणात जनावरांची वाहतूक होते. यावर अनेकदा पोलीस कारवाई होते. मात्र, तरीही चोरटी वाहतूक सुरूच हाेती. याबाबत खेर्डीतील इक्बाल खेरटकर व मुबारक खेरटकर या काका-पुतण्याने या बेकायदेशीर वाहतुकीविरोधात आवाज उठवला. त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, शनिवारी रात्री त्यांनी कुंभार्ली घाटात चिपळूणहून कऱ्हाडकडे जाणारी गाडी अडवली. या गाडीत जनावरे दिसली. यावेळी गाडीचालक नीलेश चव्हाण याच्याकडे चौकशी केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याचवेळी गाडीत चालकाशेजारी बसलेला आंबडस येथील नितीन गंगाराम चव्हाण हा पळून गेला. त्यानंतर मुबारक खेरटकर यांनी अलोरे - शिरगाव पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना फोन वरून याची माहिती दिली. त्यांनी घटनास्थळी येत नीलेश चव्हाण याला अटक करताना बोलेरो गाडी व सहा जनावरेही ताब्यात घेतली. या जनावरांची रवानगी खेड येथील गो-शाळेत करण्यात आली तर फरार असलेला नितीन चव्हाण याचा पोलीस शोध घेत आहेत. याप्रकरणी अधिक तपास हेडकॉन्स्टेबल बिरुदेव कोळेकर करत आहेत.