मशागत
जमिनीची दोन ते तीनवेळा उभी, आडवी नांगरणी करून जमीन भुसभुशीत करून घ्यावी. लावणीच्या दोन आठवड्यांपूर्वी दहा टन प्रति हेक्टरी सेंद्रिय खत पसरवावे अथवा गिरीपुष्पाचा पाला दहा टन प्रति हेक्टर चिखलणीच्यावेळी जमिनीत गाडावा. अन्यथा भाताचा पेंढा सहा इंचपर्यंत जमिनीत गाडावा. भुगा करून टाकला तर लगेच कुजतो. पालापाचोळा, काडीकचरा जाळण्याऐवजी कंपोस्ट केलं तर उत्पादन चांगले मिळू शकते.
बीज प्रक्रिया
बियाण्याची जास्तीत जास्त उगवण होण्यासाठी जोमदार रोप निर्मितीबरोबर रोग नियंत्रणासाठी बीजप्रक्रिया करणे आवश्यक आहे. प्लास्टिक भांड्यात २ ते ३ टक्के मिठाचे द्रावण तयार करून त्यात भाताचे बियाणे ओतावे. हलके, पोचट, कीडग्रस्त व नंतर तळाशी राहिलेले जड बी स्वच्छ पाण्याने २-३ वेळा धुवावे आणि २४ तास उन्हात वाळवावे. बियाणे सुकल्यावर त्याला २ ग्रॅम थायरम किंवा इमिसान प्रतिकिलोप्रमाणे चोळावे.
तण नियंत्रण
खताचा पहिला हप्ता देण्यापूर्वी बेननी करावी आणि खत दिल्यावर कोळपणी करावी. याशिवाय तणनाशकाचाही वापर करता येऊ शकतो. लावणीनंतर २ ते ३ दिवसाचे आत तणनाशक, ब्युटाक्लोर ५० किलोग्रॅम किंवा ऑक्झॅडायरजील ६ ईसी हेक्टरी ०.१२० किलोग्रॅम १.५ किलो क्रियाशील घटक प्रतिहेक्टरी युरियामध्ये मिसळून शेतात पसरले तर तण नियंत्रण शक्य होते.
खत व्यवस्थापन
भात पिकाला प्रतिहेक्टरी १०० किलो ग्रॅम नत्र, ५० किलो ग्रॅम स्फुरद, ५० किलो ग्रॅम पालाश द्यावे. यापैकी ४० किलो ग्रॅम नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश चिखलणीवेळी द्यावे किंवा मिश्र खत १५:१५:१५ प्रति गुंठा ३.३५ किलो ग्रॅम द्यावे. ४० किलो ग्रॅम नत्र खताची दुसरी मात्रा फुटवे येण्यावेळी व २० किलो ग्रॅम खताची तिसरी मात्रा पीक फुलोऱ्यावर आल्यावर द्यावी. भात उत्पादन घेताना, एकूणच खत व्यवस्थापन महत्त्वपूर्ण आहे.
पाणी व्यवस्थापन
भात लावणीनंतर आठवडाभर रोपे चांगली मुळे धरेपर्यंत शेतात पाण्याची पातळी २ ते ५ सेंटीमीटर असावी. यानंतर दाणे पक्व होईपर्यंत पाण्याची पातळी ५ सेंटीमीटर ठेवावी. लोंबी येण्याच्या दहा दिवसांपूर्वी व नंतर खाचरात १० सेंटीमीटर पाण्याची पातळी आवश्यक आहे. पाण्याची कमतरता भासल्यास उत्पादनात घट येऊ शकते.