मंडणगड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात शिमगोत्सव शांततेत पार पडावा, या उद्देशाने महसूल व पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. उत्सवकाळात कोरोना नियमावलीचे पालन उत्तमपणे केले जावे, याकरिता पोलीस पाटील, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामरक्षक कृती दलाचे प्रबोधन करण्यात आले आहे.
या निमित्ताने कुंबळे ग्रामपंचायत कार्यालयात तहसीलदार नारायण वेंगुर्लेकर व पोलीस निरीक्षक सुशांत वराळे, सरपंच किशोर दळवी यांच्या उपस्थितीत पंचक्रोशीतील सरपंच, पोलीस पाटील व गावप्रमुख यांची बैठक घेण्यात आली. यावेळी शिमगा कसा साजरा करावयाचा, याबाबत प्रशासकीय यंत्रणेकडून मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या. यावेळी कुंबळे पंचक्रोशीतील सर्व पोलीस पाटील यांचा तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. तालुक्यात सर्वच ठिकाणी प्रशासकीय यंत्रणेने जागृती केली आहे.