मंडणगड : पुणे येथे झालेल्या इनोव्हेशन कॉम्पिटिशन डिपेक्स या महाराष्ट्र राज्य स्तरावरील तंत्रशोध स्पर्धेत मंडणगडच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने (आयटीआय) राज्यात दुसरा क्रमांक मिळवला. या प्रोजेक्टचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कौतुक केले आहे.ही तंत्रशोध स्पर्धा पुणे येथील कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग (सीओईपी) येथे दि. ३ ते ६ एप्रिल यादरम्यान झाली. स्पर्धेसाठी राज्यातून सुमारे ४५४ स्पर्धक (प्रोजेक्ट) सहभागी झाले होते. आयआयटी ते आयटीआय अशा वेगवेगळ्या शिक्षण स्तरातील इंजिनीअरिंग कॉलेज यात सहभागी झाले होते. रत्नागिरी जिल्हा स्तरावर रँकमध्ये असलेल्या मंडणगड आयटीआयचा सोलर ऑपरेटर कल्टीवेटर हा प्रकल्प या स्पर्धेमध्ये सहभागी झाला होता.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या प्रकल्पाची आवर्जून दखल घेतली. या प्रोजेक्टचे मार्गदर्शक आयटीआयचे प्राध्यापक अमित तांबे व प्राध्यापक सिद्धेश चव्हाण यांनी छोट्या भाजीपाला करणाऱ्या शेतकऱ्यांकरिता हा प्रोजेक्ट कसा उपयुक्त आहे, याचे सादरीकरण केले. हा प्रोजेक्ट ‘थिंक सोलर थिंक ग्रीन’ यावर आधारित आहे.या प्रोजेक्टमध्ये सारीपुत्र पवार, विनय गणवे, समीर मेढेकर व रोहन गुजर या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. इलेक्ट्रिशियन आणि वेल्डर या दोन्ही विभागांच्या मेहनतीने हा प्रकल्प तयार करण्यात आला होता. वेल्डर विभागाचे प्राध्यापक अशोक पवार, रिजा मुजावर यांचेही यामध्ये योगदान होते. प्रोजेक्टकरिता आयएमसी ऑफ आयटीआय मंडणगडचे अध्यक्ष देवेंद्र गुप्ता, तसेच सचिव तथा प्राचार्य प्रीतम शेट्ये यांचे सहकार्य लाभले.मुंबई विभागाचे सहसंचालक नितीन निकम व मुंबई विभागाच्या पाबरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेमध्ये शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांनी सहभाग नोंदविला होता.
Ratnagiri: मंडणगड आयटीआयचा सोलर कल्टीवेटर राज्यात दुसरा, मुख्यमंत्र्यांनीही केले कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 18:41 IST