प्रशांत सुर्वेमंडणगड : काेराेनाच्या प्रादुर्भावामुळे लांबणीवर पडलेली मंडणगड नगरपंचायतीच्या निवडणुकीचे अखेर गुरुवारी बिगुल वाजले. गतवेळी राष्ट्रवादीने काॅँग्रेस आणि आरपीआयच्या मदतीने एकहाती सत्ता काबीज केली हाेती. नव्याने हाेणाऱ्या निवडणुकीत खरी लढत शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात रंगण्याची चिन्हे आहेत. महाविकास आघाडीची ‘घडी’ तालुक्यात बसली तर मात्र गणित बदलण्याची शक्यता अधिक आहे.
मंडणगड नगरपंचायतींचा कालावधी २६ नोव्हेंबर २०२० रोजी संपला होता. त्यानंतर मंडणगड नगरपंचायत दुसऱ्या निवडणुकीसाठी सज्ज झाली होती. त्यावेळी प्रभाग रचनांमध्ये प्रभाग क्रमांक बदल होऊन जुन्या प्रभागांऐवजी नवीन प्रभाग निर्माण झाले होते. त्याचप्रमाणे मतदार याद्या जाहीर होऊन अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध होणार हाेत्या. इच्छुक उमेदवारांनी प्रचारासाठी तयारीही सुरू केली होती. मात्र, काेराेनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. त्यानंतर १५ नोव्हेंबरला नगरपंचायतीचे आरक्षण जाहीर करण्यात आले, तर गुरुवारी त्यावर हरकती नोंदविण्याचा शेवटचा दिवस असतानाच निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला. त्यानुसार २३ नोव्हेंबरपर्यंत प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करावयाच्या आहेत. त्यानंतर २६ नोव्हेंबरपर्यंत हरकती व सूचना मांडावयाच्या आहेत. ३० नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी जाहीर करावयाची आहे.
मंडणगड नगरपंचायतीची स्थापना २०१५ मध्ये झाली असून, ही दुसरी निवडणूक असणार आहे. गतवेळच्या निवडणुकीत मंडणगड नगरपंचायतीमध्ये छोटे-छोटे अशा १७ प्रभागांची निर्मिती झाली होती. त्यामध्ये किमान ६० ते ७० पासून कमाल ३०० पर्यंत मतदाते होते. तत्कालीन आमदार संजय कदम यांनी किमया करीत राष्ट्रवादी काँग्रेसने मित्रपक्ष काँग्रेस व आरपीआय यांच्या मदतीने १६ नगरसेवक निवडून आणत नगरपंचायतीमध्ये एकहाती सत्ता आणली होती. शिवसेनेला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले होते.
सध्या राज्यात महाविकास आघाडी असली तरी नगरपंचायतीच्या निवडणुका राष्ट्रवादीविरुद्ध शिवसेना अशीच रंगण्याची चिन्हे आहेत. भाजप, मनसे व काँग्रेस काही प्रभागात आपले उमेदवार उभे करण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंडणगड नगरपंचायत निवडणूक गतवर्षीप्रमाणे न होता बहुपक्षीय होण्याची शक्यता आहे. मंडणगड नगरपंचायतीमध्ये मतदार मर्यादित असल्याने निवडणूक होईपर्यंत तरी मतदार राजाचे दिवस चांगले जाणार आहेत.
पक्षीय बलाबल
राष्ट्रवादी काँग्रेस ९
काँग्रेस ५
आरपीआय २