दापोली- रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड राष्ट्रीय महामार्गाचा मोबदला मिळावा यासाठी अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी प्रांत कार्यालयात घुसून जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी शेतकऱ्यांनी जोपर्यंत प्रांताधिकारी बैठकीला येणार नाही तोपर्यंत कार्यालयातून हटणार नाही अशी भूमिका घेतल्याने प्रशासनाची धांदल उडाली.राजेवाडी -आंबडवे राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. या राष्ट्रीय महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. या जमिनी अधिग्रहित करण्याची प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने राबवली जात असल्याचा शेतकऱ्यांनी आक्षेप घेतला आहे. गेले दोन वर्षे शेतकऱ्यांना या जमिनीचा मोबदला मिळाला नाही.मोबदला मिळेपर्यंत हे काम थांबवावे, शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा या मागणीसाठी शेतकरी वारंवार शासनाकडे पाठपुरावा करत आहेत. याप्रश्नी शेतकऱ्यांना प्रांत कार्यालयाकडून आज बैठकीसाठी बोलवण्यात आले होते. मात्र अचानक प्रांताधिकारी कार्यालयात उपस्थित नसल्याने शेतकरी चांगलेच संतप्त झाले.संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी चक्क प्रांत कार्यालयात घुसून घोषणाबाजी केली. जोपर्यंत प्रांत अधिकारी बैठकीला येणार नाही तोपर्यंत कार्यालयातून हटणार नाही, अशी भूमिका घेतल्याने प्रशासनाची धावपळ उडाली आहे.
Mandangad National Highway: संतप्त शेतकऱ्यांची प्रांत कार्यालयात घुसून घोषणाबाजी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2022 1:22 PM