मंडणगड : येथील पंचायत समिती शिक्षण विभागाच्या मनमानी कारभाराविरोधात धुत्रोली येथील ग्रामस्थांनी धत्रोली उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांसमवेत सोमवारपासून अचानक सुरु केलेले बेमुदत उपोषण गटशिक्षणाधिकारी पानगे यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर मागे घेतले.धुत्रोली मोहल्ला येथील उर्दू शाळेत चालू शैक्षणिक वर्षापासून आठवीचा वर्ग नव्याने सुरु करण्यात आला. शासनाच्या निकषानुसार, चार शिक्षक असतानाही शिक्षण विभागाने शाळेतील एका शिक्षकाला कामगिरीवर काढले. दुसरीकडे आठवीचा वर्ग सुरु झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी शासन अतिरिक्त शिक्षकांची नियुक्ती करेपर्यंत शिक्षण विभागाने पाचवा शिक्षक कामगिरीवर काढावा, या मागणीसाठी ग्रामस्थ महिनाभर आग्रही आहेत.शिक्षण विभाग व गटविकास अधिकारी केवळ चालढकल करीत असल्याचे या प्रकरणात निष्पन्न झाल्याने आक्रमक ग्रामस्थांनी शाळेतील विद्यार्थ्यांना समवेत घेऊन भिंगळोली येथील तहसील कार्यालयासमोरील पटांगण गाठले व उपोषण सुरू केले.ग्रामस्थांनी अचानक घेतलेल्या पवित्र्याने प्रशासन बुचकळ्यात पडले. यानंतर शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राजकुमार निगुडकर, अॅड. अभिजीत गांधी, उपतालुकाप्रमुख दोस्त चौगुल यांनी उपोषणकर्त्यांची भूमिका समजून घेतली. पंचायत समिती सदस्य आदेश केणे यांनी पंचायत समिती गाठली. सभापती अमिता शिंंदे, गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांच्याशी चर्चा करुन तांत्रिक बाबतीत बसत नसले तरी मार्ग काढण्याची विनंती केली. यानंतर कामगिरीवरील शिक्षक देण्याचे संबंधितांकडून मान्य करण्यात आले. त्यानंतर त्यांनी ग्रामस्थांची तहसील कार्यालयासमोर भेट घेऊन उपोषण सोडण्याचे आवाहन करण्यात आले. मात्र, ग्रामस्थांनी आश्वसनाचे लेखी पत्र देण्याची मागणी केली. त्यानंतर उपोषण मागे घेतले. ग्रामपंचायत सदस्य इरफान बुुरोंडकर यांच्या नेतृत्त्वाखाली ग्रामस्थ संतोष पाटे, आयुब बुरोंडकर, आकार बुरोंडकर, जकरीया बुरोंडकर, ललिफ बुरोंडकर, मजिद बुरोेंडकर, अस्लम कडेवकर, महेबूब कडवेकर उपोषणाला बसले होते. (प्रतिनिधी)मंडणगड तहसील कार्यालयासमोर धुत्रोली येथील ग्रामस्थांसह विद्यार्थीही उपोषणाला बसले होते.
मंडणगड --विद्यार्थी, ग्रामस्थांचे उपोषण
By admin | Published: August 27, 2014 10:25 PM