लाेकमत न्यूज नेटवर्क
मंडणगड : तालुक्यात दि. २५ ते २९ मे दरम्यान करण्यात आलेल्या चाचणीचा अहवाल २ जून राेजी आराेग्य विभागाला प्राप्त झाला. या अहवालानुसार एकाचवेळी १७८ बाधित रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. मात्र, हे अहवाल उशिराने प्राप्त झाल्याने काेराेनाबाधित रुग्ण अनेक ठिकाणी फिरल्याची शक्यता व्यक्त हाेत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
तालुक्यात १७८ पाॅझिटिव्ह रुग्ण अचानक आढळल्याने आराेग्य यंत्रणेची तारांबळ उडाली आहे. सध्या गृह अलगीकरण बंद असल्याने संस्थात्मक विलगीकरण कालावधीत या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्याच्या कामात आरोग्य विभागाचे कर्मचारी व्यस्त आहेत. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मंडणगड तालुक्यातील ५९१ अहवाल प्रलंबित हाेते. यातील ४९१ अहवाल २ जून २०२१ रोजी प्राप्त झाले असून, यातील १७८ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. अद्याप १०० अहवालांचा निकाल येणे बाकी आहे. रुग्णसंख्या अधिक असलेल्या गावात विलगीकरण केंद्र सुरु करत त्यात या रुग्णांची सोय करण्यासाठी महसूल विभागाने काम सुरु केले आहे. मात्र, एक किंवा १०पेक्षा कमी रुग्ण असलेल्या गावांमध्ये रुग्णांची सोय कोठे करण्यात येणार आहे, या संदर्भात आरोग्य विभागाने कोणती कार्यवाही केलेली आहे, याविषयी कोणतीही माहिती प्राप्त झालेली नाही.
मे महिन्यात तालुक्यात झालेल्या चाचण्यांचे निकाल विलंबाने येत असल्याने या प्रक्रियेवर सर्वच स्तरातून नाराजी व्यक्त हाेत आहे. दरम्यान, चाचणी झाल्यापासून संबंधित व्यक्ती विनासायास सगळीकडे संचार करत राहिल्याने संसर्स वाढला आहे. या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्यांना शोधून त्यांची चाचणी करण्याचे आव्हान आता आरोग्य विभागाला पेलावे लागणार आहे. कोरोना चाचण्यांचे अहवाल लगेच देणारी यंत्रणा नसतानाही सरसकट सगळ्यांना कोरोना चाचणी करण्याचा आग्रह तालुक्यातील खासगी वैद्यकीय व्यावसायिकही करत असल्याने तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.
-----------------------
गावनिहाय पॉझिटिव्ह रुग्ण
भिंगळोली २, दहागाव ३, घराडी २४, गोठे ७, कळकवणे १३, कांटे २९, कोंडगाव २५, कुंबळे १, मंडणगड शहर १९, सोवेली २, सुर्ले १, पाट १, आंबवणे १, चिंचघर १, देव्हारे १, नायणे ३, पाचरळ ३७, म्हाप्रळ ८