लाॅकडाऊनच्या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांना माहिती देण्यासाठी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विनाेद डवले यांनी व्यापाऱ्यांची बैठक आयाेजित केली हाेती.
लोकमत न्यूज नेटवर्क
मंडणगड : जिल्हा प्रशासनाने लाॅकडाऊनबाबत नवीन अध्यादेश जाहीर करताच त्याची अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, निसर्ग चक्रीवादळामुळे आधीच संकटात सापडलेल्या मंडणगडातील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवण्यास तीव्र विराेध दर्शविला आहे. नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विनाेद डवले यांच्यासमवेत मंगळवारी झालेल्या बैठकीत व्यापाऱ्यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली.
शासनाने मंगळवारपासून लागू केलेल्या लाॅगडाऊनच्या नवीन नियमावली नुसार अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याची सूचना केली आहे. या संदर्भात जिल्हाभरातील व्यापाऱ्यांमधून तीव्र पडसाद उमटत आहेत. मंडणगड तालुक्यात सकाळपासून सर्वच दुकाने सुरळीत सुरू होती. तालुक्यात कुठेही प्रशासनातर्फे दुकाने बंद करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या नव्हत्या. दुकानदारांनीही स्वत:हून दुकाने बंद केली नाहीत. शहरात कुठेही विनामास्क फिरू नये अशी सूचना करण्यात आली हाेती. तसेच शासनाच्या नियमावलीचे पालन करण्याचे आवाहनही करण्यात आले हाेते. त्यामुळे शहरात येणारे नागरिक माक्सचा वापर करत असल्याचे पाहायला मिळत हाेते.
दरम्यान, दुपारी मंडणगड नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विनाेद डवले यांनी शहरातील व्यापाऱ्यांची बैठक आयाेजित केली हाेती. या बैठकीत लाॅकडाऊनच्या नियमावलीबाबत माहिती देण्यात आली. त्याचवेळी व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. मात्र, व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवण्यास नकार दिला. निसर्ग चक्रीवादळामुळे येथील व्यापाऱ्यांचे खूप माेठे नुकसान झाले आहे. या नुकसानातून व्यापारी अजूनही सावरलेला नाही. त्यातच लाॅकडाऊनमुळे दुकाने बंद ठेवल्यास व्यापारी आणखी डबघाईला जातील, असे सांगून एकही व्यापारी आपली दुकाने बंद ठेवणार नाही, असे सांगण्यात आले.