प्रशांत सुर्वेमंडणगड : एकेकाळी काळ्या पाण्याची शिक्षा म्हणून ओळखला जाणारा मंडणगड तालुका हळूहळू कात टाकू लागला आहे. रत्नागिरी जिल्ह्याचे शेवटचे टाेक असलेल्या या तालुक्यात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळगाव असल्याने हा तालुका अधिक प्रकाशझाेतात आला. त्याचबराेबर किल्ले मंडणगडसह कासवांचे गाव म्हणून ओळख मिळालेल्या वेळास गावामुळे हा तालुका आता पर्यटनाचे केंद्र बनू लागला आहे. आजपर्यंत दुर्लक्षित राहिलेल्या या तालुक्यात सुख साेयी उपलब्ध करून दिल्यास हा तालुकाही पर्यटनदृष्ट्या सुजलाम सुफलाम हाेऊ शकेल.बाराही महिने गरम पाणी असणारे उन्हवरेमंडणगड व दापोली या दोन तालुक्यांच्या सीमांवर गरम पाण्याचे कुंड असलेले उन्हवरे हे गाव आहे. येथील ग्रामदेवतेच्या मंदिराच्या परिसरात असलेल्या एका कुंडात वर्षाचे बाराही महिने गरम पाणी जमिनीत झऱ्याच्या रूपाने वर येत असते. येथे येणाऱ्या पर्यटकांना या कुंडात स्नान करता यावे याकरिता या कुंडाची बांधणी करण्यात आली आहे. मंडणगड शहर व दापोली शहर येथून सुमारे अठरा ते वीस किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. आता कुंडाच्या परिसरापर्यंत जाण्यासाठी चारचाकी वाहनांकरिता थेट रस्ता तयार करण्यात आला आहे, येथे निवास वा भोजनाची व्यवस्था उपलब्ध नाही.आंबडवे
- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळगाव.
- आंबडवे गावातील बाबासाहेब आंबेडकरांचे आजाेबा लष्करी सेवेकरिता येथून स्थलांतरित झाले हाेते.
- रायगड जिल्ह्यातील महाड येथील चवदार तळ्यापासून हे गाव साठ किलोमीटर इतक्या अंतरावर आहे.
- ही दोन्ही ठिकाणे जोडण्यासाठी राष्ट्रीय महामार्गाची निर्मिती करण्यात आली आहे.
- गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ घर पाडून, या घरावर स्मारकांची निर्मिती करण्यात आली आहे.
- या ठिकाणी बाबासाहेबांचा अस्थिकलश दर्शनाकरिता ठेवण्यात आला आहे. गाडी मार्गाने जाण्यासाठी मंडणगड या तालुक्याचे मुख्य ठिकाणापासून अर्धा तास इतका वेळ लागतो. मंडणगडवरून एसटी व खासगी गाड्यांची सोय असली, तरी निवासाची व्यवस्था स्थानिक पातळीवर उपलब्ध नाही.
बाराव्या शतकापासून संदर्भ लाभलेला किल्ले मंडणगड
- शहरापासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या किल्ल्यामुळे शहर व तालुक्यास मंडणगड ही ओळख मिळाली आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी मंडणगड शहर वसले आहे. किल्ल्याला बाराव्या शतकापासूनचे ऐतिहासिक संदर्भ लाभले आहे.
- गणपती मंदिर, दोन तळी, तोफ कबर हे अवशेष किल्ल्यावर आहेत. याबरोबर नष्ट झालेल्या अनेक घरांचे चौथरेही आहेत. नगरपंचायतीने या ठिकाणी पर्यटकांसाठी अनेक सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
- शहरापासून गडावर जाण्यासाठी थेट डांबरी रस्ता तयार करण्यात आला आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील माणगाव या मुख्य ठिकाणापासून अवघ्या चाळीस किलोमीटर इतके अंतर कापल्यावर मंडणगड या ठिकाणी पोहचता येते.
किल्ले हिंमतगड
- अरबी समुद्राच्या समोरील डोंगरावर असलेला भुईकोट किल्ला. डचांचे पहिले बंदर बाणकोट या किल्ल्याच्या पायथ्याशी वसले आहे. ब्रिटिशांच्या काळात बाणकोट ते बांदा या एकत्रित रत्नागिरी जिल्ह्याचे मुख्यालय बाणकोट होते. त्याकाळी जिल्हा न्यायालयाचे कामकाज चालत असे.
- सिद्धी व डचांच्या अधिपत्याखाली हा किल्ला कायम राहिला आहे. मजूबत तटबंदी व येथील पुरातन ठेव्याची पुरातत्त्व विभागाने चार वर्षांपूर्वी डागडुजी केली आहे. किल्ल्यावरून दिसणारा अरबी समुद्र, याशिवाय उगवणारा व मावळतीला जाणारा सूर्य हे दृष्य पर्यटकांसाठी पर्वणी ठरत आहे.
- किल्ल्यावर सापडलेली तोफ व ऑर्थर मिलेट ग्रेव्हही पाहण्यासारखे आहेत. मंडणगड व श्रीवर्धन या दोन्ही ठिकाणांवरून येथे पोहचता येते. मंडणगडपासून गाडीमार्गाने चाळीस किलोमीटर इतके अंतर आहे. येथून जवळ असलेल्या वेळास, वेसवी गावात निवास व्यवस्था उपलब्ध आहे.
- मंडणगडपासून बाणकोट व किल्ले हिंमतगड येथे जाण्यासाठी एसटी उपलब्ध आहे. या किल्ल्याची डागडुजी करुन त्याचे संवर्धन करणे गरजेचे आहे. पर्यटनाच्या दृष्टीने या किल्ल्याकडे पाहणे आवश्यक आहे. हा किल्ला तालुक्याच्या साैंदर्यात आणखी भर घालू शकेल.
केशरनाथ मंदिरखेड-पुरार या राज्यमार्गावरील अवघ्या आठ किलोमीटर अंतरावर शेडवई-घराडी या दोन गावांच्या सीमांवर केशरनाथ मंदिर आहे. प्राचीन शिल्पकलेचा अजोड नमुना असलेली भगवान विष्णूची मूर्ती या मंदिरात आहे. कोकणाची अपरांत ही ओळख मंदिरातील मूर्ती आणखी पक्की करते. निसर्गरम्य व गर्द वनराईत सदैव खळखळणाऱ्या ओढ्यापाशी हे मंदिर वसलेले आहे. मंदिरात जाण्यासाठी गाडी मार्ग असला, तरी येथे निवास व अन्य व्यवस्था उपलब्ध नाहीत.