प्रकाश वराडकर ।रत्नागिरी : ब्रिटिश सत्ताकाळात उभारलेल्या रत्नागिरीतील मांडवी बंदर जेटीचे राज्य सरकारच्या मेरिटाईम बोर्डकडून नूतनीकरण व दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. या कामासाठी तब्बल ३ कोटी ६० लाख रुपये खर्च येणार आहे. मात्र, दुरुस्तीसाठी आणलेले काही साहित्य ओखी वादळाच्या तडाख्यात सागरी उधाणात वाहून गेले. त्यामुळे सुशोभिकरण व दुरुस्तीचा खर्च वाढण्याची शक्यता आहे. मे २०१८ अखेर म्हणजेच येत्या पावसाळ्याआधी हे काम पूर्ण होणार आहे. सुशोभिकरणानंतर हे बंदर जेटी पर्यटकांचे आकर्षण ठरेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
देशात ब्रिटिशांची सत्ता असताना रत्नागिरीतील मांडवी भागात अरबी समुद्रात थेट जाणारी ही २८० मीटर लांबीची व ४.२० मीटर रुंदीची बंदर जेटी १९३४मध्ये उभारण्यात आली होती. ब्रिटिश काळात तसेच स्वातंत्र्यानंतरही १९८८ पर्यंत ही प्रवासी बंदर जेटी प्रवासी जलवाहतुकीसाठी कार्यरत होती. त्यानंतर मांडवी जेटीचा जलवाहतुकीसाठीचा वापर संपुष्टात आला व समुद्रकाठचे पर्यटनस्थळ म्हणून या जेटीकडे पाहिले जाऊ लागले. गेल्या २० ते २५ वर्षांच्या काळात ही जेटी सागरी लाटांच्या तडाख्याने जागोजागी खचली आहे. अनेक ठिकाणी जेटीला तडे गेले आहेत. त्यामुळे पर्यटक व स्थानिक रत्नागिरीकरांसाठीही या जेटीचा वापर बंद करण्यात आला आहे.
रत्नागिरी शहरातील महत्त्वाचे पर्यटनस्थळ म्हणून विकसित होऊ शकणाºया मांडवी जेटीला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. सकाळी चालण्याचा व्यायाम करण्यापासून दिवसभर व रात्रीही हे बंदर रत्नागिरीकर व पर्यटकांनी गजबजलेले असते. मांडवी पर्यटन संस्थेतर्फे अध्यक्ष राजीव कीर यांनीही या बंदर जेटीच्या दुरूस्तीसाठीची मागणी लावून धरली होती. आता या जेटीच्या सुशोभिकरणाचे काम सुरू झाल्याने रत्नागिरीकरांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. जेटीची दुरुस्ती करताना ब्रिटिशकालीन खुणा जपल्या जाणार आहेत. जेटीच्या रस्त्यावर कॉँक्रीटचा थर टाकला जाणार आहे. खचलेल्या ठिकाणी दुरुस्ती केली जाणार आहे. जेटीला स्टील रेलिंग उभारले जाणार असून, पर्यटन वृध्दिसाठी आवश्यक ते सुशोभिकरण केले जाणार आहे.काम वेगात सुरू : साडेतीन कोटींचा खर्च; मे २०१८पर्यंत पूर्णत्वतीन कोटी साठ लाख खर्चातून दुरुस्ती व सुशोभिकरणानंतर मांडवी जेटीला पूर्ववैभव प्राप्त होणार.सागरी जलवाहतूकीसाठी मांडवी बंदर जेटीचा वापर होण्याची शक्यता असल्याने त्या दृष्टीनेही विकास केला जाणार.ओखी वादळादरम्यान दुरुस्ती साहित्य वाहून गेल्याने दुरुस्ती व सुशोभिकरण कामाचा खर्च वाढण्याची शक्यता.मांडवी बंदर जेटी येथे पर्यटन विकासाच्या हेतूने विविध सुविधा विकसित करण्यावर शासन भर देणार.