दापाेली : दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित सोहनी विद्यामंदिर दापोलीमधील शिशुवाटिका व प्राथमिक विभागात ऑनलाइन मंगळागौर कार्यक्रम साजरा करण्यात आला. विद्याभारती विभागप्रमुख भाग्यश्री बिवलकर व शिक्षिका पूर्वा शिंदे यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
संध्या रेवाळे यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची रूपरेषा मांडली. यानंतर उपस्थित शिक्षिकांनी दंड फुगडी, आगोटापागोटा, झिम्मा फुगडी, बस फुगडी, लाटाबाई लाटा यासारखे विविध नृत्याविष्कार सादर केले. यामधून व्यायाम ‘अभिव्यक्ती; सुसूत्रता, सण’ व्रत यामधील वैज्ञानिक दृष्टिकोन व कलामनोरंजनातून प्रबोधन करण्यात आले. पालक व शिक्षिकांनी उखाणे घेऊन कार्यक्रमाची रंगत अधिक वाढविली. सोहनी विद्यामंदिरमधील सर्व शिक्षिका व ताई यामध्ये उत्साहाने सहभागी झाल्या होत्या, तसेच मुख्याध्यापक अनिल शेठ उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उमेश रेवाळे व अभिषेक बुरटे यांनी मेहनत घेतली.