मेहरुन नाकाडे
रत्नागिरी : दोन्ही पाय कमकुवत असल्याने चिपळूण तालुक्यातील कामथे येथील मंगेश रांगळे यांनी फुलांचा व्यवसाय सुरू केला. चिपळूण बाजारपेठेत व्यवसायात चांगला जमही बसला. लॉकडाऊनमध्ये काेलमडलेला व्यवसाय पुन्हा उभा केला. परंतु, अतिवृष्टीमुळे आलेल्या महापुरात संपूर्ण व्यवसायच बुडून गेला. त्याचवेळी आरएचपी फाउंडेशनने पाठबळ दिले आणि मंगेश रांगळे यांनी १३ दिवसातच पुन्हा व्यवसाय उभारला. दिव्यांग असतानाही मनाच्या उमेदीने त्यांचा हा व्यवसाय पुन्हा बहरला आहे.
दोन्ही पायात कमकुवतपणा असला तरी मनाने मात्र मंगेश कणखर होता. त्यामुळे उदरनिर्वाहासाठी मिळेल ते काम करण्यासाठी सतत धडपड सुरू होती. पानटपरी, फूलविक्रेत्यांकडे पुण्यात काही वर्षे काम करताना गावाच्या ओढीने गावाकडे ते परतले. रत्नागिरी जिल्हा पॅराप्लेझिकल हॅण्डीकॅप फाउंडेशनने दिव्यांगासाठी आयोजित केलेल्या शिबिरात मंगेश यांनी सहभाग घेतला हाेता. संस्थापक सादिक नाकाडे यांच्या मार्गदर्शनानंतर त्यांनी व्यवसाय करणे निश्चित केले. संस्थेच्या माध्यमातून चिपळूण येथे फूलविक्रीचा व्यवसाय सुरू केला. दोन वर्षे व्यवसायाला पूर्ण झाली. व्यवसायात जम बसत असतानाच कोरोनामुळे सलग दोन वर्षे लॉकडाऊनचा फटका बसला. मात्र, तरीही न डगमगता व्यवसाय सुरू ठेवला. लॉकडाऊन संपल्यानंतर व्यवसायात वृद्धी करण्यासाठी आवश्यक त्या साहित्याची जुळवणी केली. मात्र, जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीने व्यवसाय महापुरात वाहून गेला.
व्यवसाय पुन्हा उभा करणे अशक्य होते. मात्र, आरएचपी फाउंडेशनने व्यवसाय उभा करण्यासाठी आश्वासन दिले. इतकेच नव्हे तर १३ दिवसात व्यवसाय उभा करून दिला. जनरेटरसह काही लागणाऱ्या गोष्टींची उपलब्धता करून दिली. लॉकडाऊन, महापुराचा सामना करून नव्या उमेदीने पुन्हा व्यवसाय सुरू केला आहे.
मुलाच्या उपचारासाठी दागिने विकले
मंगेश रांगळे यांच्या आईवडिलांनी त्यांच्या उपचारासाठी अथक परिश्रम घेतले. दागिने विकून शस्त्रक्रिया केली. मात्र, पूर्णत: उपचार होऊनही पाय कमकुवतच राहिले. त्यामुळे नववीपर्यंतच शिक्षण घेता आले. अर्धवट शिक्षण साेडावे लागल्याचे शल्य त्यांच्या मनात हाेतेच, पण त्यांनी जिद्द साेडली नाही.