रत्नागिरी : वाढत्या उष्म्यामुळे आंबा लवकर तयार होवू लागल्याने बाजारात आवक वाढली आहे. त्यामुळे ग्राहकांना अस्सल कोकणचा हापूस रास्त दरात उपलब्ध होण्यासाठी ‘उत्पादक ते ग्राहक’ या संकल्पनेवरील राज्य कृषी पणन मंडळाच्या २३ व्या हापूस आंबा महोत्सव सोमवार दि. १ एप्रिलपासून पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे.
राज्य कृषी पणन मंडळासह व पुणे जिल्हा परिषदेच्या सहकार्याने आंबा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवामध्ये रत्नागिरी, सिंधुदूर्ग, रायगड जिल्ह्यातील तसेच राज्यातील केसर आंबा उत्पादकांबरोबर जिल्हा परिषदेकडील ग्रामीण विकास यंत्रणा विभागाकडील काही महिला बचत गट सहभागी होणार आहेत. या महोत्सवात सुमारे १२५ स्टाॅल असतील. हा महोत्सव पुण्यातील मार्केट यार्ड येथील पीएमटी बस डेपो शेजारील जिल्हा परिषदेच्या मोकळ्या जागेत होणार आहे.
आंबा महोत्सवात कोकण हापूससह मराठवाड्यातील केस आंबा देखील उपलब्ध असणार आहे. तसेच १० बचतगटांच्या स्टाॅलमधून विविध प्रक्रियायुक्त उत्पादने खरेदीची संधी लाभणार आहे. हा महोत्सव दि. ३१ मे पर्यंत सुरू राहणार आहे. कोकणातील उच्च प्रतीच्या हापूस आंब्याचा तसेच राज्याच्या विविध भागांतील केसर आंब्याचा लाभ ग्राहकांनी घ्यावा, असे आवाहन पणन मंडळाने केले आहे.