साखरपा/आंबा : रत्नागिरी - काेल्हापूर मार्गावरील आंबा घाटातील कळकदराजवळ शनिवारी दुपारी दरड रस्त्यावर आल्याने सुमारे तीन तास वाहतूक बंद ठेवण्यात आली हाेती. गेले दहा दिवस पावसाने विश्रांती घेतली होती. या भागात सातत्याने काेसळणाऱ्या दरडींमुळे ओझरे आणि निनावे गावांवरील धाेक्याची टांगती तलवार कायम आहे.
या मार्गावर २२ जुलैला कोसळलेल्या दरडीमध्ये पाणी मुरल्याने शनिवारी पुन्हा दरड रस्त्यावर आली. त्यानंतर तातडीने साखरपा व आंबा पोलीस नाक्यावर पोलिसांनी वाहने थांबवली हाेती. बांधकाम विभागाने जेसीबीच्या सहाय्याने २ वाजता पडलेली दरड ५ वाजेपर्यंत हटवली. त्यानंतर आंबा नाक्यातून एक तासानंतर वाहने साेडण्यात आली.
कळकदराजवळ शनिवारी पडलेली दरड दरीतील निनावे गावावर जाण्याचा धोका कायम आहे. चार ठिकाणी दरड निनावे व ओझरे गावांवर कोसळली होती. दोन्ही गावांमधील कुटुंबांना वस्ती सोडून सुरक्षितस्थळी स्थलांतरित होण्याची नोटीस प्रशासनाने दिली आहे. मात्र, सव्वादोनशेपेक्षा जास्त कुटुंबे कुठे जाणार, असा प्रश्न विचारला जात आहे. पाऊस पुन्हा जोर धरू लागल्याने डोंगरावर थांबलेली दरड वस्तीवर येईल, या भीतीने निनावे व ओझरे ग्रामस्थांचा जीव टांगणीला लागला आहे.