संगमेश्वर तालुक्यातील रत्नागिरी - कोल्हापूर महामार्गावरील दोन जिल्ह्यांना जोडणारा अतिशय महत्त्वाचा घाट म्हणजे आंबा घाट. रत्नागिरी आणि कोल्हापूर या दाेन्ही जिल्ह्यांना जाेडणारा हा घाट असला तरी आजही हा घाट अनेक समस्यांच्या गर्तेत सापडला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव कोणतीही उपाययोजना नसल्याने आंबा घाटातील रस्ता पावसाळ्यात धोकादायक ठरत आहे. त्यामुळे वाहनधारकांना वाहने जीव मुठीत धरूनच चालवावी लागतात. पावसाळ्यात वारा, पाऊस याबराेबरच धुक्याचाही सामना वाहनचालकांना करावा लागत आहे.
दोन वर्षांपूर्वी ओझरेखिंड येथे खचलेला रस्ता अद्याप तसाच असून, त्याकडे संबंधित खात्याने दुर्लक्ष केले आहे. त्याठिकाणच्या संरक्षक भिंतीही दरीत कोसळल्या असून, राहिलेल्या भिंतीही पडण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे याठिकाणी असलेल्या रस्त्यावरून सध्या एकेरी वाहतूक सुरू आहे. पावसाळ्यात हा घाट अतिशय धोकादायक ठरत आहे, काही ठिकाणी नियमित पावसाळा सुरू होण्यापूर्वी दरडी काेसळण्याचा प्रकार घडत आहे. दरडींबराेबरच या महामार्गावरील जीर्ण झाडेही धोक्याची बनली आहेत. ताैक्ते वादळाच्या आधी झालेल्या वादळाने घाटातील दख्खन - बौद्धवाडीनजीक कोसळलेल्या भल्या मोठ्या आंब्याच्या झाडाने महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे रोखून धरली होती. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या, अद्यापही काही झाडे धोकादायक बनली आहेत.
घाटमाथ्यावरून प्रवेश करताना डावीकडे व जाताना उजवीकडे असणारे संरक्षक कठडे नादुरुस्त असून, दरीच्या बाजूने काही कठडे पडले आहेत. अनेकदा अपघातावेळी याच कठड्यामुळे अनेकांचे प्राण वाचले आहेत. पण संरक्षक कठडे अधिक मजबूत बांधण्याची गरज आहे. रत्नागिरी - कोल्हापूर महामार्गावरील हा रस्ता रुंदीकरणाच्या प्रतीक्षेत असून, ओझरेखिंड येथे बोगदा काढणार असल्याचे समजते, मात्र त्याला अद्याप मुहूर्त सापडलेला नाही़. घाटातील रस्ता हा म्हणावा तितका रुंद नसून, पावसाळ्यात साईडपट्टीवरुन वाहने नेल्यास चिखलात रुतून बसतात. अनेक वर्षांपूर्वी घाटात रात्रीच्या वेळेस पाेलिसांची व्हॅन गस्त घालत असे. मात्र, सध्या तीही बंद झाली आहे.
---------------------------------
गायमुख आकर्षण
घाटातील गायमुख हे पर्यटकांचे विशेष आकर्षण आहे. बारमाही वाहणाऱ्या गोमुखातील पाणी वाहनधारकांची तहान भागवते. याठिकाणी थाेडावेळ थांबून पर्यटक नंतरच पुढच्या प्रवासाला जातात. त्याचबरोबर गायमुखासमोर दरीत संकटमोचक हनुमान मंदिर असून, त्याठिकाणी जाण्यासाठी रस्ताही करण्यात आलेला नाही़. या ठिकाणाचा विकास झाल्यास पर्यटनाला चालना मिळू शकते.
------------------------
अपघातप्रवण क्षेत्र
आंबा घाट हा अपघातप्रवण क्षेत्र असून, अनेक अपघात झाले आहेत. घाटात अपघात झाल्यास तातडीची मदत मिळण्यास अनेक अडचणी येतात. त्यातच गेले अनेक महिने साखरपा दूरक्षेत्रात फोन नसल्याने पोलिसांना संपर्क करण्यात अडचणी निर्माण होतात. आंबा घाटात एखादा अपघात झाल्यास पोलिसांना याची कल्पना द्यायची कशी, ही मोठी समस्या आहे, त्यामुळे मदतीचे कोणतेही साधन नसल्याने मदतकार्यात अडचणी येतात.