रत्नागिरी : कोकण व पश्चिम महाराष्ट्राशी जोडणाऱ्या आंबा घाटात दोन ठिकाणी एका बाजूने रस्ता पूर्ण खचला आहे. तेथे तळातून रेटिंग वॉल (संरक्षक भिंत) बांधण्यात येणार आहे. सुमारे साडेचार कोटींचे हे काम लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे आंबा घाट अवजड वाहतुकीसाठी खुला करण्यास अजून दीड महिना लागणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय राज्य मार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
आंबा घाट सर्व वाहनांसाठी खुला करण्यात आल्याची माहिती माजी आमदार सुभाष बने यांनी दिली. मात्र, याबाबत जिल्हा पोलीस दल आणि राष्ट्रीय राज्य मार्ग प्राधिकरणाने आंबा घाट अवजड वाहतुकीसाठी अजूनही धोकादायक असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे फक्त छोट्या वाहनांना आंबा घाटातून परवानगी आहे. आंबा घाटात २२ जुलैला मोठ्या प्रमाणात दरड कोसळली होती. दरड हटवण्याचे काम पंधरा दिवस सुरू होते; मात्र, दरड हटवल्यानंतर दोन ठिकाणी अधिक धोकादायक स्थिती असल्याचे लक्षात आले. त्यापैकी एका ठिकाणी रस्त्याची एक बाजू पूर्ण खचली ते अधिक धोकादायक आहे.
खचलेल्या अर्धा रस्त्यामध्ये कठडा बांधून डोंगराच्या बाजूला गटारावर स्लॅब टाकून रस्ता वाढवण्यात आला आहे. आणखी एका ठिकाणी डोंगर घसरून तो रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला शेतात गेला आहे. तो भाग पुन्हा कधीही खचण्याची शक्यता आहे. अन्य दोन ठिकाणी मोठ्या प्रमाणात दरड कोसळली आहे. अवजड वाहनांमुळे खचलेल्या या रस्त्यांचा धोका अधिक वाढू शकतो. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अवजड वाहतुकीला आंबा घाटातून बंदी घातली आहे.
प्राधिकरणाने आंबा घाटातील या दोन धोकादायक ठिकाणांच्या दुरुस्तीचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी साडेचार कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले. याचे काम लवकरच सुरू होणार असून अजून दीड महिन्यांनंतर आंबा घाट सुरू होईल, असा अंदाज प्रकल्प संचालक पंदरकर यांनी सांगितले.