रत्नागिरी : यावर्षी लांबलेल्या पावसामुळे आंब्याचा हंगाम नियोजित वेळापत्रकापेक्षा उशिरा सुरू झाला. आंबा उत्पादन अत्यल्प असतानाही कॅनिंग सुरू झाले असल्याने शेतकरी धास्तावले आहेत. कॅनिंग सुरू झाल्यानंतर आंब्याची चोरी वाढते. त्यामुळे शेतकऱ्यांनी बागेतील पहारा कडक केला आहे.
मार्चमध्ये आंबा बाजारात आला; परंतु उत्पादन अत्यल्प होते. एप्रिलमध्येही आंबा उत्पादन फारच कमी हाती आले आहे. तयार झालेला आंबा शेतकरी मुंबई, पुणे, कोल्हापूर, अहमदाबाद मार्केटमध्ये विक्रीला पाठवित आहेत. दराचा अंदाज घेत शेतकऱ्यांनी खासगी विक्रीवरही विशेष भर दिला आहे.
वातावरणातील बदलांमुळे आंब्यावर रोग पडण्याचे प्रमाण अधिक आहे. तुडतुड्याच्या विष्ठेमुळे आंब्यावर काळे डाग पडतात. अशा आंब्याला चांगला दर मिळत नाही. त्यामुळे निवडक आंब्याच्या पेट्या भरल्यानंतर उर्वरित आंबा किलोवर विकल्यास शेतकऱ्यांना घरबसल्या रोखीने पैसे मिळतात. ग्रामीण भागाबरोबर शहरातही कॅनिंगचा आंबा खरेदी करण्यात येत आहे. आंबा उत्पादन कमी असतानाही कॅनिंगला समाधानकारक दर मिळत नसल्याचे वातावरण आहे. २५ ते २६ रुपये किलो दराने खरेदी सुरू आहे. आंबा कमी असल्याने बाजारात त्याला चांगला दर अपेक्षित असतानाच कॅनिंग सुरू झाले आहे. कॅनिंगसाठी आंबा खरेदी सुरू झाल्यानंतर आंब्याची चोरी होण्याचे प्रकार वाढतात. त्यामुळे धास्तावलेल्या शेतकऱ्यांनी सध्या बागेत जागता पहारा ठेवला आहे.
..........................
कॅनिंग व्यवसायामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. चोरी वाढत असल्यामुळे बागायतदार किंवा कराराने बागा घेऊन व्यवसाय करणाऱ्यांकडूनच कॅनिंग विक्रेत्यांनी आंबा विकत घ्यावा. चोरीचा किंवा रात्री अपरात्री आंबा विक्रीस आणणाऱ्यांकडून आंबा विकत घेऊ नये. जेणेकरून चोरीला आळा बसेल. वास्तविक आंबा पीक येईपर्यत प्रचंड खर्च करावा लागत असल्यामुळे या व्यवसायावर कुठेतरी नियंत्रण येणे आवश्यक आहे.
- एम. एम. गुरव, आंबा बागायतदार, रत्नागिरी