आॅनलाईन लोकमतदापोली , दि. १८ : दिवसेंदिवस उन्हाचा कडाका वाढत आहे. तसेच दोन दिवसात राज्यात उन्हाच्या पाऱ्यात वाढ होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला असल्याने याचा परिणाम तयार फळबागांवर होईल की काय, या भीतीने शेतकरी त्रस्त झाले आहेत. मात्र, शेतकऱ्यांनी घाबरण्याचे कारण नसून अशा उन्हाच्या कडाक्याचा परिणाम तयार फळांवर होत नसल्याचे येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या सुत्रांनी स्पष्ट केले आहे.आंबा, काजू ही फळे लहान असताना यांच्यावर तुडतुडे, बुरशी यांसारखे रोग होतात, तर प्रचंड ऊन पडल्यामुळे मोहोर करपतो आणि बागायतदारांचे प्रचंड प्रमाणात नुकसान होते. परंतु एकदा का फळ तयार झाले की, त्यावर उन्हाचा कोणताही परिणाम जाणवत नाही किंंवा उन्हामुळे सहजासहजी आंबा पिकतही नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरण्याचे कारण नाही, असे विद्यापीठाकडून सांगण्यात आले. हिवाळ्यापासून शेतकरी आपल्या बागायतींच्या देखभालीकडे लक्ष ठेवून असतो. झाडांना पाणी देणे, झाडांवर फवारणी करणे अशा प्रकारची काळजी घेत असतात.परंतु काही वेळा योग्य त्या औषधांची फवारणी केली नाही तर या झाडांवर किंवा फळांवर बुरशी, तुडतुडे अशा प्रकारचे रोग निर्माण होतात. त्यामुळे आंबा, काजूचे नुकसान होते. त्यामुळे बागायतदारांनी आपल्या बागेची काळजी घेणे आवश्यक आहे. परंतु उन्हाचा पारा वाढणार असला तरी सर्व फळे तयार झालेली असताना त्यांच्यावर परिणाम जाणवणार नसल्याचे विद्यापीठाकडून चौकशीदरम्यान सांगण्यात आले. त्यामुळे वाढत्या उष्म्याची बागायतदारांनी काळजी करण्याचे गरज नाही. तसेच काही वाटल्यास विद्यापीठाकडे संपर्क साधून योग्य ते मार्गदर्शन घ्यावे व त्याप्रमाणे उपाययोजना करावी, असेही सांगण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
आंबा, काजूवर वाढत्या उष्म्याचा परिणाम नाही
By admin | Published: April 18, 2017 1:44 PM