आवाशी : कोकणात लोटे औद्योगिक वसाहतीत मँगो पार्क उभारण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे उद्याेगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी रविवारी (दि. ६) लोटे (ता. खेड) येथील उद्योग भवन येथे आयाेजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली. गेल्या काळात वेदांतासारखे प्रकल्प राज्याबाहेर गेल्याचे दुःख आहेच; पण त्याहीपेक्षा मोठे प्रकल्प राज्यात आम्ही आणू, असे त्यांनी सांगितले.लोटे औद्योगिक वसाहतीला उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रविवारी भेट दिली. या भेटीत त्यांनी उद्योग भवन येथे उद्योजक संघटना, स्थानिक नागरिक, समाजसेवी संघटना यांच्यासोबत संवाद साधला तसेच समस्यांबाबत निवेदनही स्वीकारली.मंत्री सामंत यांनी सांगितले की, लोटे औद्योगिक वसाहतीसंदर्भात प्राप्त सर्व निवेदनावर पुढच्या आठवड्यात बैठक घेण्यात येईल. या बैठकीत मँगो पार्कबाबतची माहिती दिली जाईल, असे त्यांनी सांगितले. औद्योगिक वसाहतीला भेडसावणारी पाणी समस्या सोडवण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल. प्राथमिक आरोग्य केंद्राचे श्रेणी वर्धन करण्यासाठी मी तत्त्वतः मान्यता दिली आहे. याबाबत आवश्यक निधीची तरतूद करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.लोटे औद्योगिक वसाहतीमधील उद्योजकांनी अपघात कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत. कामगारांना सुरक्षा साधने पुरवण्याची, प्रदूषण होऊ नये यासाठी कारखानदारांनी काम करावे, अशी सूचना केल्याचे त्यांनी सांगितले. कोकणासह राज्यात नवीन प्रकल्प आणण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहेत. त्याचाच भाग म्हणून लवकरच दिल्ली येथे जाऊन मी केंद्रीय मंत्र्यासोबत चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. रिफायनरी प्रकल्प हा बेरोजगारांच्या हाताला रोजगार देणारा आहे. प्रकल्पाचे महत्त्व स्थानिकांना पटवून देऊन तो करण्याच्या दृष्टीने हे सरकार सकारात्मक आहे, असे मंत्री सामंत म्हणाले.माजी पर्यावरण मंत्र्यांना टोचलेलोटे औद्योगिक वसाहतीमध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कार्यालय व्हावे यासाठी गत मंत्रिमंडळातील पर्यावरण मंत्र्यांसोबत मी बोललो होतो. परंतु, काही झाले नाही, असे सांगून अप्रत्यक्षपणे त्यांनी तत्कालीन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना टोचले. आगामी कालावधी याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले.
मध्यावधी निवडणुका नाहीत
आमच्या सरकारचा आकडा १७० वरून १८२ होणार आहे. त्यामुळे आपल्या सोबतचे आमदार व कार्यकर्ते कुठेही जाऊ नये म्हणून काही लोक हे सरकार कोसळणार आणि आमचा मुख्यमंत्री होणार असे सांगत आहेत. मात्र, मध्यावधी निवडणुका होणार नाहीत, असे मंत्री सामंत म्हणाले़