रस्ता दुरुस्तीची मागणी
रत्नागिरी : तालुक्यातील नेवरे गावातील ढोकमळे ते बाजारपेठ मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. खड्ड्यांतून पावसाचे पाणी साचले असल्याने वाहन चालविणे अवघड बनले आहे. खड्ड्यांतून वाहन चालविताना, पावसाचा अंदाज येत नसल्याने अपघाताचा धोका निर्माण झाल्याने रस्ता दुरुस्तीची मागणी होत आहे.
मोकाट जनावरांचा उपद्रव
रत्नागिरी : सागरी महामार्गावरील रत्नागिरी ते शिरगाव मार्गावर मोकाट जनावरांचा उपद्रव वाढला आहे. रात्रीच्या वेळी गुरे कळपाने हिंडत आहेत. शिवाय रस्त्यातच ठाण मांडत असून, सकाळी रस्त्यावर शेणाचा सडा पडत असल्याने सकाळच्या सत्रात येणाऱ्या जाणाऱ्या पादचाऱ्यांसह वाहनचालकांनाही याचा त्रास होत आहे. परिसरात दुर्गंधी पसरली आहे.
खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त
रत्नागिरी : शहरातील कोकण नगर, आझाद नगर, नायाब नगर रस्त्याची दुरवस्था झाली आहे. वारंवार रस्ता दुरस्तीची मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. रस्त्यावर खड्डे पडले असून, खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचत असल्याने अंदाज घेत नाही, परिणामी अपघाताचा धोका वाढला आहे.
शिक्षक भरती रखडली
रत्नागिरी : गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेली शिक्षक भरती कोरोनामुळे थांबली आहे. २०१७ पासून भरती सुरू झाली. भाजप सरकारनंतर आघाडी सरकारला भरती पूर्ण करता न आल्याने शासनविरोधी असंतोष निर्माण झाला आहे. भरती पूर्ण करण्याची मागणी शिक्षकांमधून होत आहे.
भात लागवडीची कामे सुरू
गणपतीपुळे : पंचक्रोशीमध्ये सध्या भात लागवडीची कामे सुरू झाली आहेत. भाताची रोपे काढून ती खाचरातून लावण्यात येत आहेत. सध्या नांगराऐवजी पॉवरटिलरचा वापर शेतकरी करू लागले आहेत. पावसाने विश्रांती घेतली असल्याने मळेशेतीमध्ये लागवड सुरू आहे.
गणेशमूर्ती शाळेत लगबग
रत्नागिरी : सध्या गणेशमूर्तीशाळेत गणेशमूर्ती रेखाटण्याचे काम जोरात सुरू आहे. मूर्तीशाळेतही सोशल डिस्टन्सिंग राखण्यात येत असून, बाहेरून कामाशिवाय येणाऱ्यांना मज्जाव करण्यात येत आहे. शासनाच्या नियमावलीनुसार एक ते तीन फूट उंचीपर्यंतच्याच गणेशमूर्ती तयार केल्या जात आहेत.
सिग्नल बंदच
रत्नागिरी : शहरातील वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी बसविण्यात आलेली सिग्नल यंत्रणा लॉकडाऊन पूर्वीपासूनच बंद आहे. बंद सिग्नलमुळे वाहनकोंडी वाढत आहे. परिणामी वाहनचालकांमध्ये वाद होत आहेत. नगरपरिषद प्रशासनाने सिग्नल यंत्रणा बसविली असून, त्याकडे दुर्लक्ष होत आहे.
चंपक मैदानात दुर्गंधी
रत्नागिरी : शहरातील उद्यमनगर येथे येणाऱ्या चंपक मैदानात सर्व प्रकारचा कचरा टाकण्यात येत आहे. स्थानिक तसेच बाहेरच्या गावातील मंडळीदेखील गाड्यांतून आणून कचरा टाकत असल्याने दुर्गंधी पसरली आहे. कचरा टाकू नये यासाठी ग्रामपंचायतीने सूचना फलक लावले असतानाही, त्याकडे दुर्लक्ष होत आहे. कचऱ्यामुळे पसरणाऱ्या दुर्गंधीचा स्थानिक रहिवासी व पादचाऱ्यांना याचा त्रास होत आहे.
खड्डे बुजविण्याचे काम निकृष्ट
रत्नागिरी : शहरात लॉकडाऊनपूर्वी पाण्याच्या वाहिनीबरोबर खासगी वाहिनीसाठी ठिकठिकाणी खड्डे खोदण्यात आले. पावसामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली असून, नगर परिषद प्रशासनाकडून खड्डे बुजविण्यात येत असून, काम अतिशय निकृष्ट असल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे.