लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी आठवड्यातील दोन दिवस लाॅकडाऊनची घोषणा केली आहे. लाॅकडाऊन काळात शनिवारी, रविवार दोन दिवस सर्व प्रकारची दुकाने व सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र जीवनावश्यक वस्तूंना परवानगी दिली आहे. त्यामुळे वाशी येथील आंबा विक्री व्यवस्था सुरू राहणार असणार असल्याने बागायतदारांना दिलासा प्राप्त झाला आहे.
ऋतुमानातील बदलामुळे यावर्षी आंबा उत्पादनावर परिणाम झाला आहे. एकूणच आंबा उत्पादन कमी आहे. त्यातच तयार झालेला आंबा बाजारात विक्रीसाठी येऊ लागला आहे. बहुतांश आंबा बागायतदार वाशी येथील मार्केटमध्ये आंबा विक्रीसाठी पाठवित आहेत. शिवाय सुरत, अहमदाबाद, पुणे, सांगली, कोल्हापूर येथील मार्केटमध्ये आंबा विक्रीसाठी पाठवितात. वास्तविक आंबा झाडावरून काढल्यानंतर तो विक्रीसाठी तातडीने पाठविण्यात येतो. मात्र अंतर अधिक असल्याने दुसऱ्या दिवशी सकाळी आंबा मार्केटमध्ये पोहोचला तर त्यादिवशी विक्री होते. अन्यथा विक्रीसाठी तिसरा दिवस उजाडतो. नाशिवंत माल यामध्ये मोडत असल्याने आंबा विक्रीसाठी पाठविण्याबाबत शेतकरी सजग असतात.
लाॅकडाऊनच्या घोषणेमुळे आंबा बागायतदारही धास्तावले होते. त्यांनी तातडीने प्रशासन तसेच व्यापाऱ्यांशी चर्चा केली असताना जीवनावश्यक वस्तूंना परवानगी असल्याने मार्केटमधील खरेदी, विक्रीचे व्यवहार सुरळीत असणार असल्याचे सांगण्यात आल्याने बागायतदारांना दिलासा प्राप्त झाला आहे.
खासगी विक्रेतेही सरसावले
गतवर्षी वाशी मार्केटमध्ये कोरोना रुग्ण सापडल्यामुळे व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. आंबा विक्रीचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र खासगी विक्रेत्यांनी थेट शेतकऱ्यांशी संपर्क साधून आंबा खरेदी करून विकल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले नाही. यावर्षीही विक्रेते बागायतदारांशी थेट संपर्क साधत आहेत. परंतु खासगी विक्रीमध्ये काही विक्रेते शेतकऱ्यांचे पैसे देताना त्रास देत असल्याचा गतवर्षीचा अनुभव असल्याने बागायतदार वाशी मार्केटवर अवलंबून आहेत.
कोट घ्यावा
आठवड्यातून दोन दिवस लाॅकडाऊन घोषित करण्यात आले आहे. वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीला रविवारी सुटी असते. जीवनावश्यक वस्तूंसाठी शासनाने परवानगी दिली आहे. त्यामुळे शनिवारी विक्री सुरू राहणार आहे. सकाळच्या सत्रात आंबा मार्केटमध्ये पोहोचण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यामुळे आंबा बागायतदारांचे नुकसान होणार नाही.
- संजय पानसरे, संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती