लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : हापूस आंबा पेट्याच्या वाहतुकीसाठी राज्य परिवहन महामंडळाचा रत्नागिरी विभाग सज्ज झाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यासाठी ३०, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी २० मालवाहू ट्रक पुरविण्यात येणार आहेत. दि. ५ एप्रिल ते दि. ३१ मे पर्यंत आंबा वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे.
कोरोनामुळे गतवर्षी लॉकडाऊनमुळे आंबा वाहतुकीसाठी समस्या उद्भवली असताना, रा. प. विभागाने तत्परता दाखविली होती. एस.टी.तून आंबा वाहतूक करण्यात आली होती. मुंबई उपनगरांसह अन्य जिल्ह्यातही आंबा एसटीतून पोहोचविण्यात आला होता. यावर्षीही एस.टी.ने निर्णय आंबा वाहतुकीचा निर्णय घेतला असून, त्यासाठी महामंडळाच्या मालवाहतूक गाड्याही सज्ज झाल्या आहेत.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कोकण भागातून मुंबई, ठाणे, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, तसेच इतर जिल्ह्यांमध्ये एसटी गाड्यांद्वारे आंबा वाहतूक करण्यात येणार आहे. मुंबईतील मुंबई सेंट्रल किंवा परळ, कुर्ला नेहरू नगर, पनवेल, ठाण्यामध्ये ठाणे-१ किंवा ठाणे-२, भिवंडी, बोरिवली-सुकुरवाडी किंवा कल्याण, पुणे पिंपरी-चिंचवड यासह सांगली, सातारा, कोल्हापूरला आंबा पाठविता येणार आहे.
आंबापेटी वाहतुकीसाठी ३०० कि.मी.पासून ते १५०० कि.मी.पर्यंत पाच डझन आंब्याच्या पुठ्याच्या पेटीसाठी ४० रुपयांपासून १९० रुपयांर्यंत दर निश्चित करण्यात आले आहेत, तर लाकडी पेटीसाठी ५० रुपयांपासून २५० रुपयांपर्यंत दर आकारण्यात येणार आहेत. दोन डझन पेटीसाठी २५ पासून ११० रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. बागायतदारांनी, शेतकऱ्यांनी जवळच्या आगारात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.