रत्नागिरी : नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हा कॉँग्रेसच्या महिला आघाडीप्रमुख असलेल्या मंजिरी साळवी यांनी बुधवारी मुंबई येथे शिवसेनेत प्रवेश केला. शिवबंधन बांधून सेनेत त्यांना अधिकृत प्रवेश देण्यात आला. मंजिरी साळवी गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसच्या सक्रीय कार्यकर्त्या होत्या. त्यांच्याकडे महिला जिल्हा आघाडीचे अध्यक्षपद होते. परंतु गेल्या काही काळात जिल्ह्यात कॉँग्रेसची स्थिती जिल्ह्यात कमकुवत बनली आहे. जिल्ह्यात कॉँग्रेस पक्षाला गेल्या अनेक महिन्यांपासून जिल्हाध्यक्ष मिळालेला नाही. या पार्श्वभूमीवर मंजिरी साळवी यांनी सहा महिन्यांपूर्वीच काँग्रेस पक्ष सदस्यत्वाचा दिलेला राजीनामा मंजूर झाला होता. शिवसेनेत पक्षप्रवेशाबाबत दूरध्वनीवरून विचारता साळवी म्हणाल्या, कॉँग्रेसचा आपण आधीच राजीनामा दिला होता. मात्र, आता रत्नागिरीत सेनेच्या माध्यमातून काम करण्याची इच्छा आहे. त्यासाठीच सेनेत प्रवेश केला आहे. येत्या निवडणुकीत नगरपरिषदेसाठी उमेदवारी मिळाल्यास निवडणूक लढवणार असल्याचे त्या म्हणाल्या. या प्रवेश सोहळ्याच्या वेळी जिल्हा संपर्कप्रमुख विजय कदम, जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, आमदार उदय सामंत, शिवसेना जिल्हा महिला आघाडीप्रमुख शिल्पा सुर्वे, नगरसेवक संजय साळवी, राहुल पंडित आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)
मंजिरी साळवी शिवसेनेत
By admin | Published: September 22, 2016 12:47 AM