रत्नागिरी : संविधानाने मतदानाचा हक्क प्रत्येक भारतीय नागरिकाला दिला आहे. १८ वर्षानंतर हा हक्क बजावता येतो. मतदानाचा हक्क असतानाही अनेक जण मतदान करीत नाहीत. काही अनुत्सुक असतात तर काही मतदानासाठी बाहेर पडणेच टाळतात. मात्र परदेशात राहणाऱ्यांना मतदार यादीत नाव असतानाही आपल्या व्यस्त वेळापत्रकामुळे मतदानासाठी येणे शक्य होत नाही. परंतु अमेरिकेत राहणाऱ्या मात्र रत्नागिरीची सूनबाई असलेल्या मानसी अजिंक्य पेडणेकर यांनी खास मतदानासाठी भारतात आल्या असून सावंतवाडी मतदान केंद्रावर जावून त्यांनी हक्क बजावला हे विशेष!मानसी या सावंतवाडीच्या माहेरवाशीण आहेत. गतवर्षी दि.३० मे २०२३ रोजी मानसी या रत्नागिरीतील दैवज्ञ पतसंस्थेचे चेअरमन व दैवज्ञ समाजाचे माजी अध्यक्ष विजय पेडणेकर यांचे सूपूत्र अजिंक्य यांच्याशी विवाहबध्द झाल्या. लग्नानंतर त्या काही दिवसातच पती समवेत अमेरिकेला रवाना झाल्या. त्यामुळे त्यांचे सावंतवाडी मतदारसंघातील नाव कायम राहिले, रत्नागिरीत बदलता आले नव्हते. लोकसभेच्या निवडणूका जाहीर झालेनंतर त्या मतदानाला येण्यासाठी खास उत्सुक होत्या. त्यानुसार त्या काही दिवसापूर्वीच भारतात आल्या आहेत.सोमवारी (दि.६) त्या सावंतवाडीकडे मतदानासाठी रवाना झाल्या. सावंतवाडी केंद्रावर त्यांनी वडिल गिरीधर यांच्या समवेत मतदानाचा हक्क बजावला. मतदानाचा हक्क बजावल्याचा त्यांना विशेष आनंद आहे. मानसी विज्ञानशाखेच्या पदव्युत्तर असून लग्नानंतरही त्यांचे पुढील उच्च शिक्षण सुरू आहे. त्यामुळे लवकरच त्या पुन्हा अमेरिकेला रवाना होणार आहेत.
LokSabha2024: खास मतदानासाठी रत्नागिरीच्या सूनबाई अमेरिकेतून आल्या भारतात
By मेहरून नाकाडे | Published: May 07, 2024 6:21 PM