लांजा :
तालुक्यात सोमवारी एका दिवसामध्ये कोरोनाचे सर्वाधिक तब्बल २० रुग्ण आढळल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. निवसर बौद्धवाडी आणि व्हेळ मोगरगाव येथील कोरोना रुग्ण कमी होण्याचे नाव घेत नसल्याने आरोग्य यंत्रणा हतबल झाली आहे.
तालुक्यातील कोरोना रुग्ण झिरोवर आले होते. मात्र, पुन्हा तालुक्यात दिवसागणिक कोरोनाचे दोन तीन रुग्ण आढळत होते. निवसर बौद्धवाडी येथे आढळलेल्या कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचे कोरोना स्वॅब घेण्यात आल्यानंतर दिवसातून एक - दोन कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. सोमवारी निवसर बौद्धवाडी येथील आरटीपीसीआर कोरोना अहवाल प्राप्त झाला. त्यामध्ये ७ वर्षीय मुलगा, ११ व ९ वर्षीय मुली असे एकूण तीन कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. व्हेळ मोगरवाडी येथे कोरोना विस्फोट झाला असून, कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेले तब्बल १२ जणांचे आरटीपीसीआर अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. यामध्ये ५९ व ५२ वर्षीय प्रौढ पुरुष, ५० व ४० वर्षीय महिला, १३ वर्षीय मुलगा, ६९ व ४१ वर्षीय महिला, १० वर्षीय मुलगा, ७५ वर्षीय प्रौढ पुरुष, २२ वर्षीय तरुणी, २७ वर्षीय महिला, ६५ वर्षीय प्रौढ महिला असे एकूण १२ कोरोना पाॅझिटिव्ह आढळले आहेत.
तसेच शहरातील वैभव वसाहत येथील २९ वर्षीय तरुण, प्रभानवल्ली गोसावीवाडी येथील ६५ वर्षीय प्रौढ महिला, पनोरे मोर्येवाडी येथील ४५ वर्षीय महिला, प्रभानवल्ली नांगरफळे येथील ५५ वर्षीय महिला, कोर्ले बौद्धवाडी येथील ६० वर्षीय प्रौढ पुरुष असे तालुक्यात तब्बल २० कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत.
तालुक्यातील कोरोनाची एकूण रुग्णसंख्या ६०८ झाली आहे, तर ५३३ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तालुक्यात सध्या ६० रुग्ण ॲक्टिव्ह आहेत व १५ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.