चिपळूण : सायंकाळची वेळ होती, सूर्य अस्ताला चालला होता, सोनेरी किरणं उतरणीला लागली होती. उकाड्याने हैराण झालेल्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना मधूनच येणारी वाऱ्याची झुळूक अंगाला गारवा देत होती, नकळत डोळ्यांच्या पापण्या जडावत मधूनच डुलकी आली नाही तर नवलच... संघटनेचे जिल्हा संपर्कप्रमुख मार्गदर्शन करत असताना व्यासपीठावरील पदाधिकारीच डुलक्या देऊ लागले तर कार्यकर्त्यांचे काय? चक्क जिल्हा परिषद अध्यक्षांच्या बाबतीत हे घडल्याने शिवसैनिकांनी आश्चर्य व्यक्त केले.जिल्हा संपर्कप्रमुख विजय कदम यांचा मंगळवारी खडपोली येथे दौरा होता. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका जवळ आल्याने शिवसेनेने पंचायत समिती गणात मेळावे सुरु केले आहेत. स्वत: संपर्कप्रमुख कदम, जिल्हाप्रमुख सचिन कदम, आमदार सदानंद चव्हाण, क्षेत्रप्रमुख बाळा कदम, तालुकाप्रमुख सुधीर शिंदे, महिला आघाडीप्रमुख रेश्मा पवार आदी मेहनत घेत आहेत. शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न साकार करण्यासाठी व संघटना वाढीसाठी प्रत्येकाची धडपड सुरु आहे. खडपोली येथील मेळावाही असाच होता. जिल्हाप्रमुख कदम संघटना वाढीसाठी मार्गदर्शन करीत होते. यावेळी ते उपस्थितीबाबत असमाधानी दिसले. त्यांनी प्रत्येकाला निमंत्रण मिळाले की नाही, इथपासून ते तालुकाप्रमुखांच्या कामाच्या अहवालाचीही चौकशी करुन कानपिचक्या दिल्या.कदम संघटनेविषयी पोटतिडकीने बोलत असताना काही पदाधिकारी डुलक्या देत होते. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तर चक्क झोपले होते. त्यांना झोप अनावर झाली होती. एका कार्यकर्ऱ्याने त्यांना फोटो काढण्याच्या बहाण्याने उठवण्याचा प्रयत्नही केला. पण तोही दमला. हे चित्र पाहून काही शिवसैनिकांनीच नाराजी व्यक्त केली. जिल्हाप्रमुख व संपर्कप्रमुख अशा जबाबदार पदाधिकाऱ्यांची झोप कशी उडवणार हा खरा प्रश्न आहे. संघटनेला पुढे नेण्यासाठी जागरुक राहायला हवे. आपल्याला गोलमडे यांनी राजकारणात आणले, अशी स्तुस्तीसुमने आमदार चव्हाण यांनी उधळल्याचा तर हा परिणाम नाही ना? अशीही चर्चा सुरु होती. (प्रतिनिधी)
संपर्कप्रमुखांच्या मेळाव्यात अनेकांच्या डुलक्या
By admin | Published: March 16, 2016 8:25 AM