मालदोली येथील तांबे यांना लियाकत शाह, खालिद दलवाई, अमजद मुकादम आदींनी आर्थिक मदत केली.
............................
लोकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : मालदोली मोहल्ला येथील आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेला गोठा व जनावरे यांच्या मालकाला दुग्ध व्यावसायिक अजीज म. इसाक तांबे यांना येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन आर्थिक मदत केली.
मागील आठवड्यात मालदोली मोहल्ला येथे दुपारच्या सुमारास एका गोठ्याला भीषण आग लागली. या आगीत पंधरा जनावरांपैकी नऊ जनावरे दगावली. संपूर्ण गोठा आगीत जळून खाक झाला. उर्वरित सहा जनावरांना आगीची प्रचंड झळ बसून जखमी झाली आहेत. अनेक वर्षे तांबे हे मालदोली परिसरात दुग्ध व्यवसाय करीत आहेत. संपूर्ण गावात दूध पुरविण्याचे काम करीत आहेत.
या आगीमुळे त्यांचा व्यवसाय पूर्णपणे बंद झाला आहे. तांबे यांना मानसिक व आर्थिक आधार देण्यासाठी चिपळुणातील सामाजिक कार्यकर्ते व न्यू इंडिया इन्शुरन्सचे विकास अधिकारी खालिद दलवाई, काँग्रेस शहराध्यक्ष लियाकत शाह, उद्योजक अमजद मुकादम, इकबाल मुकादम, शकील चौगुले, यासीन दळवी, अशरफ मेमन, रईस अलवी यांनी मालदोली येथे जाऊन तांबे यांना रोख रक्कम स्वरूपात मदत केली. ज्यांना शक्य असेल त्यांनी तांबे यांना मदत करावी, असे आवाहन लियाकत शाह यांनी केले आहे.