शिरगाव : मराठा, बहुजन समाजावर होणारे अत्याचार थांबवण्यासाठी शिवकाळात छत्रपती शिवरायांनी स्वराज्य संकल्पना सत्यात आणली. सर्वच लढणारे होते. मात्र, पुढील पिढीला सांगणारे, लिहिणारे नव्हते. आमच्यासमोर आले ते चिकित्सा न करता स्वीकारले. मराठा समाजच नेतृत्त्वास लायक असल्याचे एकूण आजची स्थिती पाहता समजते. मात्र, आपला मेंदू गुलाम असेल, तर समाजाला आपण पुढे नेऊ शकणार नाही. मन, मनगट, मेंदू, मस्तक सशक्त असणारे मराठे समाजाचा, देशाचा आधारस्तंभ बनतील, यासाठी समाजाने आत्मशोध घेण्यासाठी वाचन करावे, असे विचार मराठा सेवा संघाचे मार्गदर्शक तानाजी घरत यांनी चिपळूण येथे मांडले. चिपळूण तालुका मराठा सेवा प्रतिष्ठान आयोजित शिवजयंतीनिमित्त चिपळुणात संस्थेचे संकल्प जाणून ‘मराठा तितुका मेळवावा, गुणदोषासह स्वीकारावा’ ही संकल्पना मांडली. बऱ्याचवेळा आपण अहंकार, अनावश्यक स्पर्धा करतो. सांघिक एकोप्यातील ताकदीपेक्षा स्वत:च्या ताकदीवर आपला जास्त विश्वास असतो. अवघ्या महाराष्ट्राचे चित्र पाहता कधीच दुष्काळ न पडणाऱ्या कोकणात अधिक गतिमान राहायला हवे. मात्र, आमचीच ओळख स्वत:ला न झाल्याने स्वराज्याला ४०० वर्षे झाली. आम्ही विशेष काही केले नाही, याबाबत खंत व्यक्त केली. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष सुधीर भोसले यांनी स्त्री शक्तीचे प्रतीक राजमाता जिजाऊंचे, छत्रपती शिवरायांचे खरे चरित्र जाणण्यासाठी प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी सिंधखेडची शिवसृष्टी पाहावी. सर्वांना बरोबरीने पुढे नेणाऱ्या मराठ्यांनी आपण आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिकदृष्ट्या मागासले आहोत, हे अगोदर कबूल करावेच लागेल. दि. १९ फेब्रुवारीही एकच तारीख जगात एकाच दिवशी शिवजयंती होण्यासाठी विचार मंथनातून ठरली. मराठ्यांचा इतिहास जगाने अभ्यासला. मात्र, विभागून भारतरत्न दिलेले संगणकतज्ञ विजय भटकरवगळता भारतरत्न कोण झाले? असे अनेक प्रश्न उपस्थित केले. प्राथमिक शिक्षकांच्या पुढाकाराने मराठा समाज एकत्रिकरण, विविध सामाजिक उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून स्थापित संस्थेला जिल्हाप्रमुख सचिन कदम, भाजप तालुकाध्यक्ष रामदास राणे, राष्ट्रवादी युवकचे मयूर खेतले, मराठा सेवा संघ कोकण विभाग सचिव बाळकृष्ण परब यांनी शुभेच्छा दिल्या, तर कार्यास प्रारंभी देणगीदाखल १ लाख रुपये व शिवप्रतिमा कापसाळ येथील सतीश मोरे यांनी दिली. राष्ट्रसेवा दल, स्वरदर्शन कलाकुंज, चिपळूणतर्फे रवींद्र चव्हाण, संतोष जाधव, उत्तरा भागवत, राहुल साडविलकर, दिलीप सकपाळ यांनी पोवाडा सादर केला. शिक्षक नियोजनबध्दरित्या समाजाचे प्रश्न सोडवण्यात पुढे आल्याबद्दल विविध कंपन्या, बँकांतील सुजाण नागरिक, समाजबांधवांनी समाधान व्यक्त केले. यावेळी मराठा समाजातील १५० महिला पुरुष उपस्थित होते. कार्यक्रमासाठी संकेश गायकवाड, राजेंद्र महाडिक, संतोष शिंदे, बाबासाहेब भोसले, सचिन चव्हाण, नरेश मोरे, बळीराम मोरे, विकास नलावडे, दीपक शिंदे, विलास गुजर, जयेंद्र शिंदे यांनी योगदान दिले. (वार्ताहर)चिपळूण येथील मराठा सेवा प्रतिष्ठानतर्फे आयोजन.मराठा, बहुजनांवर होणारे अत्याचार थांबविण्यासाठी स्वराज्य संकल्पना.आपला मेंदू गुलाम असेल, तर समाजाला पुढे नेऊ शकत नाही.
मराठा समाजाने आत्मशोधासाठी वाचन करावे
By admin | Published: March 28, 2016 10:55 PM