देवरूख : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाला राज्यभर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मराठा समाजाच्यावतीने आज संगमेश्वर बंदची हाक देण्यात आली होती. या आंदोलनामुळे संगमेश्वर, देवरूख, साखरपा, आरवली, माखजन भागात १०० टक्के बंद पाळण्यात आला होता. तालुक्यातील ग्रामीण भागातील बाजारपेठादेखील बंद ठेवण्यात आल्या होत्या.मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्यभर आंदोलन सुरू करण्यात आले आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मराठा क्रांती मोर्चातर्फे महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. त्याला राज्यभर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रत्नागिरी जिल्ह्यातही महाराष्ट्र बंदला चांगला प्रतिसाद मिळाला.
अनेक ठिकाणी रास्तारोको आंदोलनही करण्यात आले. या बंदच्या पार्श्वभूमीवर आज संगमेश्वर बंदची हाक देण्यात आली होती. सकाळपासूनच मराठा समाजाचे बांधव रस्त्यावर उतरू लागले होते. या आंदोलनाला तालुकाभरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तालुक्यातील सर्व बाजारपेठा कडकडीत बंद ठेवण्यात आल्या होत्या. तालुक्यातील ग्रामीण भागातील बाजारपेठादेखील बंद ठेवण्यात आल्या होत्या.देवरूखात क्षत्रिय मराठा समाजाने मोर्चा काढून घोषणाबाजी केली. या मोर्चामध्येदेखील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग होता. या आंदोलनात कडवईतील रिक्षा व्यावसायिकदेखील सहभागी झाले होते. कडवई, तुरळ आणि धामणी येथेही कडकडीत बंद पाळण्यात आला होता. तालुक्यातील सर्वच ठिकाणचे व्यवहार या बंदमुळे ठप्प झाले होते.बाजारपेठांमध्ये कोणीच फिरकला नसल्याने संगमेश्वर बसस्थानकातही शुकशुकाट होता. बंदमुळे एस्. टी.च्या गाड्या बसस्थानकात उभ्या करून ठेवण्यात आल्या होत्या. तालुक्यात करण्यात आलेल्या बंदमध्ये कोणताच अनुचित प्रकार घडलेला नाही. संपूर्ण तालुक्यात शांततेत बंद पाळण्यात आला.