रत्नागिरी : कोकणातील आंबा काजू शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी व प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवार दि. २५ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर बागायतदारांनी धडक मोर्चा आयोजित केला आहे. बागायतदारांच्या सहनशीलतेचा अंत न शासनाने पाहू नये. अन्यथा येथील बागायतदारांनाही वेगळ्या पध्दतीने विचार करावा लागेल, असा इशारा पावस आंबा उत्पादन संघाचे अध्यक्ष प्रकाश साळवी यांनी बागायतदारांतर्फे दिला आहे.आंबा- काजू बागायतदारांच्या प्रश्नांबाबत आतापर्यंत निव्वळ आश्वासने देण्यात आली, ठोस कार्यवाही अद्याप केलेली नाही. यावर्षी एकूण आंबा उत्पादन अत्यल्प असल्याने बागायतदारांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे.याबाबत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चाचे आयोजन केले असल्याची माहिती साळवी यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शासन सकारात्मक निर्णय घेईल अशी अपेक्षा आहे. अन्यथा शेतकऱ्यांना वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा यावेळी उपस्थित बागायतदारांनीही दिला.आंबा, काजू, फळबागायतदार, शेतकरी, छोटे व्यवसायिक यांची संपूर्ण कर्ज मुक्ती विना अट, सरसकट झालीच पाहिजे. कोकणातील प्रदूषण कारखाने बंद झालेच पाहिजे. कर्जदार शेतकऱ्यांचे ७/१२ चे उतारे कर्जमुक्त झाले पाहिजे. सन २०१४-१५ या वर्षापासून २०२३-२४ पर्यंत सर्व शेतकऱ्यांचे व्याज व पुढील वर्षासाठी चार टक्के व्याजाने शासनाने कर्ज उपलब्ध करून दिले पाहिजे. शेतकऱ्यांचा कृषीपंप व घरगुती मीटरचे दर कमी करण्यात यावे. खते, आैषधांच्या किंमती भरमसाठ वाढलेल्या आहेत, त्यांचा जीएसटी माफ करावा किंवा शेतकऱ्याने खते व आैषधे खरेदी केलेल्या बिलावर शासनाने अनुदान द्यावे. आंब्याच्या तसेच कोकणातील विविध पिकांच्या संशोधनासाठी रत्नागिरी येथे सुसज्ज अशी प्रयोगशाळा करण्यात यावी.आंबा बागायतदार, शेतकरी, त्यांचे कुटूंबिय, त्यांच्या सोबतीने काम करणारे कामगार (महिला व पुरूष) यांना जीवन व आरोग्य विमा संरक्षण मिळावे. शेतांमध्ये बागांमध्ये काम करत असताना सर्पदंश, जंगली श्वापदे, झाडावरून पडणे, फवारणी करताना विषबाधा, ह्रदयविकार यामुळे मृत्यू आल्यास दोन्ही विमा संरक्षण मिळणे आवश्यक आहे. या विविध मागण्यांसाठी शेतकरी धडक मोर्चा आयोजित करण्यात आला असल्याचे प्रकाश साळवी यांनी सांगितले.यावेळी कुमार शेट्ये, नंदकुमार मोहिते, मंगेश साळवी, मनसूर काझी, सचीन आचरेकर, अमृत पोकडे, किरण तोडणकर, अशोक भाटकर, प्रल्हाद शेट्ये, ज्ञानेश्वर पोतकर उपस्थित होते.
रत्नागिरीत आंबा, काजू बागायतदारांच्या न्याय मागण्यासाठी येत्या मंगळवारी धडक मोर्चा
By मेहरून नाकाडे | Published: July 21, 2023 5:46 PM