गणपतीपुळे : आधुनिक मराठी कवितेचे जनक कवीवर्य कृष्णाजी केशव दामले तथा केशवसुत यांचे जन्मघर व भव्यदिव्य आकारातील आकर्षक स्मारक, रमणीय सुंदर व स्वच्छ समुद्र किनारा, पुरातन मंदिर, समुद्र, आंबा, काजू व नारळ - पोफळीच्या बागा अशा निसर्ग सानिध्याने नटलेल्या व विविध सोयीसुविधांनी युक्त असलेल्या मालगुंड या गावाला गेल्या काही वर्षापासून अनेक पर्यटक भेट देऊ लागले आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस ही संख्या वाढतच असल्याने येथील पर्यटन व्यवसायाला चालना मिळावी. पर्यटकांना या भागातल्या लोककला, खाद्यसंस्कृ ती व स्वच्छ परिसर इत्यादीविषयी आवड निर्माण व्हावी आणि पर्यटकांना नवनवीन सोयीसुविधा मिळण्याकरिता गावामध्ये नवीन व्यावसायिक तयार व्हावेत, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून मालगुंड ग्रामपंचायत व मालगुंड पर्यटन समितीने या कामी गावातील पर्यटन व्यावसायिकांना बरोबर घेऊन दि. २८ ते ३१ डिसेंबर २०१४ या कालावधीत मालगुंड सागरी महोत्सवाचे आयोजन केले आहे. या सागरी महोत्सवाची येथील पर्यटन समितीने जय्यत तयारी केली असून यावर्षी मालगुंड येथील खारभूमीच्या भव्य मैदानावर यंदाचा महोत्सव विविध भरगच्च कार्यक्रमांनी साजरा करण्यासाठी पर्यटन समितीने अतिशय परिपूर्ण नियोजनावर भर दिला आहे. त्या दृष्टीने आता महोत्सवाची तयारीदेखील अंतिम टप्प्यात आली असून पर्यटन समितीचे अध्यक्ष राजेंद्र शिंदे व मालगुंड ग्रामपंचायतीच्या सरपंच साधना साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली समितीचे सदस्य,पदाधिकारी संपूर्ण कार्यक्रमाची आखणी करण्यासाठी मग्न आहेत. पर्यटन समितीने समितीचे अध्यक्ष राजेंद्र शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मालगुंड येथील गायवाडी समुद्र चौपाटीवर पहिला सागरी महोत्सव यशस्वी झाला होता. यावर्षीचा महोत्सव अधिक पटीने सरस करण्यासाठी पर्यटन समितीने यावर्षी विनोदी अभिनेता दिगंबर नाईक, सिने अभिनेता ऋषीकेश दळी, राहुल मेहेंदळे व सिने अभिनेत्री सुप्रिया पाठारे उपस्थित राहणार आहेत. मालवणी नाटक ‘आधी मस्ती - अर्धा डॉन’ सादर होणार असल्याचे मालगुंड पर्यटन समितीचे अध्यक्ष राजेंद्र शिंदे यांनी दिली. जाखडी, ढोलवादन स्पर्धा ‘मी संगमेश्वरी बोलतोय’ हा आनंद बोंद्रे यांचा कार्यक्रम, तर राज्य नाट्य परिषदेतील तृतीय क्रमांक प्राप्त नाटक या व्याकूळ संध्या समयी आणि मुंबई येथील नामवंत कलाकारांचा आॅर्के स्ट्रा असे भरगच्च कार्यक्रम संपन्न होणार आहेत. यावेळी विविध क्षेत्रातील नामवंतांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे. तर महोत्सवात गावातील तरुण - तरुणींना व विशेषत: बचत गटांच्या महिलांना अर्थाजनाचे साधन उपलब्ध व्हावे, याकरिता स्टॉल तयार करुन दिले जाणार आहेत. अशा प्रकारे विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांनी महोत्सव साजरा करण्यात येणार असल्याचे समितीचे अध्यक्ष राजेंद्र शिंदे व मालगुंडच्या सरपंच साधना साळवी यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले. (वार्ताहर)
मालगुंड येथे सागरी महोत्सव २०१४
By admin | Published: December 14, 2014 12:05 AM