रत्नागिरी : गेला बराच काळ मंदीने झाकोळलेली बाजारपेठ दीपावली खरेदीच्या निमित्ताने उजळून निघाली आहे. लक्ष्मीपूजन आणि भाऊबिजेच्या खरेदीसाठी गुरूवारीही बाजारपेठेतील ग्राहक लाट कायम होती. दिवाळी खरेदीत लाखो रूपयांची उलाढाल झाल्यामुळे व्यापारीवर्ग सुखावला आहे. त्यातही सर्वाधिक खरेदी कपड्यांचीच झाली आहे. निवडणुका आणि दिवाळी या दोन्ही गोष्टी जोडून आल्यामुळे फटाक्यांची विक्रीही मोठ्या प्रमाणात झाली आहे.गणपतीच्या दिवसात बाजारपेठेत चांगली गर्दी झाली होती. मुंबईकर मोठ्या संख्येने आपल्या गावी येत असल्यामुळे त्या दिवसात बाजारपेठेला थोडी तेजी येते. पण, त्यात गणपतीची आरास तयार करण्यासाठीचे, सजावटीचे सामान मोठ्या प्रमाणात संपते. कपडे किंवा दागिने खरेदी फार मोठ्या प्रमाणात होत नाही. त्यामुळे बराच काळ बाजारपेठेतील मंदी कायम होती. दिवाळीमध्ये ही कसर बऱ्याच अंशाने भरून निघाली आहे.दिवाळीच्या आठ दिवस अगोदरपासूनच बाजारपेठेत आलेली ग्राहक लाट दिवाळीच्या दुसऱ्या दिवशीही (लक्ष्मी पूजनला) कायम होती. दिवाळीचे वातावरण सुरू झाल्यापासूनच बाजारपेठेतील गर्दी वाढू लागली. एका बाजूला आॅनलाईन खरेदीचे प्रमाण वाढत असले तरी दुसरीकडे बाजारपेठेतील गर्दीही कायम असल्याचे चित्र दिसत आहे. त्यातही सर्वाधिक गर्दी कपड्यांच्या दुकानात होती. अलिकडे सोन्याचे भाव चांगलेच वाढलेले असल्याने ती खरेदी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरची होऊ लागली आहे. त्यामुळे सोने-चांदी खरेदीचा वेग कमी झाला आहे. हा वेग वाढावा, यासाठी दीपावलीच्या कालावधीत होऊ शकणारी सोनेखरेदी लक्षात घेऊन हा दर काहीसा कमी झाला आहे. त्यामुळे साने-चांदीची दुकानेही ग्राहकांनी उजळली. यावर्षी फटाके विक्रीही दणदणीत झाली आहे. निवडणुकांचे निकाल आणि त्यानंतर लगेचच आलेली दिवाळी यामुळे फटाक्यांच्या विक्रीतही आतषबाजी झाली आहे. जागोजागी फटाके विक्रीचे स्टॉल्स लागले आहेत आणि सर्व ठिकाणी लोकांची गर्दी आहे. तुळशीच्या लग्नापर्यंत फटाके वाजवले जात असल्याने फटाक्यांना चांगलीच मागणी आहे. रत्नागिरीतील आविष्कार या मतिमंद मुलांच्या संस्थेने आपल्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या दीपावलीच्या वस्तू विकण्यासाठी मारूती मंदिर येथे स्टॉल लावला होता. छोटे आकाशकंदील, रंगीत पणत्या, मेणबत्त्या यांसारख्या वस्तूंना लोकांनी अतिशय चांगला प्रतिसाद दिला. छोट्या आकाशकंदिलांनाही मोठी मागणी होती. तयार फराळालाही यावर्षी मोठे मार्केट होते. दिवाळीपूर्वी आलेल्या निवडणुकांच्या कामात अडकलेल्या नोकरदारांनी तयार फराळ घेण्यालाच प्राधान्य दिले. त्यामुळे अशा वस्तूंचा खपही यंदा मोठा होता. चकलीच्या तयार भाजणीची विक्रीही मोठ्या प्रमाणात झाली. (प्रतिनिधी)
लाखो रूपयांच्या उलाढालीने बाजारपेठ प्रकाशली
By admin | Published: October 23, 2014 10:12 PM