खेड : कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा शर्थीचे प्रयत्न करत असताना दुसरीकडे मात्र, बाजारपेठेत
खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांकडून शासनाचे नियम पायदळी तुडवले जात आहेत. अत्यावश्यक सेवेतील दुकाने केवळ चारच तास खुली राहत असल्याने खरेदीसाठी
ग्राहकांची झुंबड उडून सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडत आहे. या पार्श्वभूमीवर गर्दी
नियंत्रणात आणण्यासाठी वाणीपेठ येथील मुख्यमार्गच अडवून वाहनांना अटकाव केला आहे.
शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचा कहर सुरूच आहे. दिवसागणिक कोरोनाचे रुग्ण आढळत असल्याने प्रशासकीय यंत्रणा पुरत्या हतबल झाल्या आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू असून केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकाने चार तास खुली ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. किराणा मालासह भाजीपाल्याच्या खरेदीसाठी बाजारपेठेत एकच गर्दी उसळत आहे. याशिवाय अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर फिरणाऱ्यांची संख्याही वाढली आहे.
प्रशासनाकडून सातत्याने नियमांचे काटेकोरपणे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना देऊनही त्याकडे कानाडोळाच केला जात असल्याने नगरपालिका प्रशासन सतर्क झाले आहे. नगरप्रशासनाचे पथक सकाळच्या सुमारास बाजारपेठेत फेरफटका मारत असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकान व्यावसायिकांसह
नागरिकांवर कारवाई करण्यात येत आहे.
बाजारपेठेतील गर्दी आटोक्यात आणण्यासाठी मुख्य मार्गच अडवण्यात आला आहे. यामुळे
बाजारपेठेतील वाहनांच्या वर्दळीला ब्रेक लागला आहे.
.................................
khed-photo303
खेड शहरात बाजारपेठेतील गर्दी आटोक्यात आणण्यासाठी बाजारपेठेतील
मुख्य मार्ग अडविण्यात आला आहे.