गुहागर : तालुक्यात लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी गुहागरसह शृंगारतळी, आबलोली, तळवली, पालशेत या बाजारपेठा पूर्णपणे बंद होत्या. रस्त्यावर तुरळक गर्दी होती.
गुहागर बाजारपेठेमध्ये जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद होती. रात्रीपासूनच पोलिसांचीे गस्त सुरू असल्याने रस्त्यावर तुरळक गर्दी होती. तब्बल आठ दिवसांनंतर गुहागर ग्रामीण रुग्णालयाचे लसीकरण केंद्र सुरू झाल्याने अनेकांनी लसीकरण केंद्राकडे धाव घेतली. पण अनेकांना गर्दीअभावी लस मिळू शकली नसल्याने परत जावे लागले.
शृंगारतळीतही कडकडीत बंद पाळण्यात आला. तालुक्यात विनामास्क तसेच विनाकारण फिरणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनचालकांवर पोलिसांनी कारवाईचे सत्र सुरू ठेवले आहे. यामध्ये बहुतांशी कारवाई शृंगारतळीमध्ये केली आहे.
बुधवारी तालुक्यात दुचाकी व चारचाकी अशा ७० वाहनांवर कारवाई करत १४ हजार ५०० इतका दंड वसूल करण्यात आला. विनामास्क फिरणाऱ्या चारजणांना प्रत्येकी ५०० प्रमाणे २ हजार दंड केला. कोविड टेस्ट न करता दुकान उघडल्याप्रकरणी १० जणांना १० हजार रुपये दंड आकारण्यात आला.
आबलोली बाजारपेठेतही बहुतांशी दुकाने बंद होती. आबलोली बाजारपेठ ही मध्यवर्ती बाजारपेठ असून आजुबाजूच्या २५ गावांतून ग्रामस्थ खरेदीसाठी येतात. आबलोली बाजारपेठेतील व्यापाऱ्यांच्या मंगळवारी कोरोना चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये काहीजण पॉझिटिव्ह आढळले.
.........................
लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी गुहागर बाजारपेठेमध्ये जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता सर्व दुकाने बंद होती. (छाया : संकेत गाेयथळे)