रत्नागिरी : तुझ्या पतीकडून उसने घेतलेले पाच हजार रुपये परत करायला आलो आहे. तू बस थांब्यावर ये, असे सांगत विवाहितेला जबरदस्तीने जंगलात नेले व तिच्यावर अतिप्रसंग केल्याप्रकरणी येथील न्यायालयाने आरोपी तरुणाला ७ वर्षे सक्तमजुरी व २५ हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.
तालुक्यातील वाटद खंडाळा परिसरात घरकाम करणारी महिला असून, ६ जून २०१७ रोजी घरकाम संपवून ती ६ वाजता खंडाळा बसथांब्यावर थांबली होती. त्यावेळी अमित यशवंत जाधव (रा. वाटद खंडाळा) हा तेथे आला व ५ हजार रुपये तिच्या पतीकडून उसने घेतले होते ते परत करायचे आहेत, अशी बतावणी केली. त्यानंतर त्याने ७ जूनला रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास अमित याने पुन्हा पीडितेला फोन केला. मी अमित बोलतोय, पैसे घेऊन आलोय, तू बसथांब्याजवळ ये व पैसे घेऊन जा, असे सांगितले. रात्र झाल्याने मी येऊ शकत नाही, तूच पैसे घेऊन घरी ये, असे पीडित महिलेने त्याला सांगितले. मात्र त्याने नकार दिला.
त्यानंतर पीडित महिला पैसे घेण्याकरिता रात्री ९ वाजण्याच्या सुमारास बसथांब्याजवळ गेली. तेथे अमित हा अॅक्टिव्हा गाडी घेऊन उभा होता. त्याच्याकडे तिने पैशांची मागणी केली. पैसे आणलेले नाहीत, असे सांगू लागताच पीडित महिला पुन्हा घरी येण्यासाठी निघाली. मात्र, तिला जबरदस्तीने गाडीवर बसवून त्याने तिचे तोंड दाबले तसेच गाडी थोडी पुढे नेवून रस्त्याच्या बाजूला वडाच्या झाडाखाली उभी केली. त्यानंतर तिला निर्जनस्थळी नेले व जबरदस्तीने तिच्यावर अतिप्रसंग केला. तिला मारहाण केली तसेच धमकावले.
याप्रकरणी पीडितेने जयगड पोलीस स्थानकात तक्रार दिली होती. त्यानुसार अमित जाधव याच्याविरोधात भारतीय दंड विधान कलम ३७६, ३३६, ३२३, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला होता.