देवरुख : ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन या संघटनेला ७५ वर्षे पूर्ण झाली. संघटना ७६ वर्षात पदार्पण करीत असताना प्रमुख शहरातील वृत्तपत्र वाटप / विक्रेते यांना सॅनिटायझर व मास्कचे वाटप करण्यात आले. शहरातील संघटनेचे पदाधिकारी कॉम्रेड विनोद कदम, ज्ञानेश्वर ठाकूर, आशिष बोकडे, आधार वासनिक, स्वप्निल पाटील यांनी मास्क व सॅनिटायझरचे वाटप केले.
जनावरांसाठी आयुर्वेद
रत्नागिरी : कृषी उपायुक्त जनावरांना फिरते दवाखाने उपलब्ध करून देण्यासाठी मोबाईल व्हॅन उपलब्ध करून देताना आता फिरत्या दवाखान्याद्वारे जनावरांवर आयुर्वेदिक उपचारासाठी मान्यता देण्यात आली आहे. तसा करार आयुष मंत्रालय व कृषी विभागांतर्गत झाला आहे. त्याचा लाभ जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह पशुपालकांनाही होणार आहे.
विमा संरक्षणाची मागणी
देवरुख : प्रत्येक ग्रामपंंचायतीतील ग्राम कृती दलातील सदस्य आपला जीव धोक्यात घालून प्रत्येक गावात काम करीत आहे. मात्र त्यांना वाली कोण, असा प्रश्न कोंडअसुर्डेचे सरपंच श्रीराम शिंदे यांनी केला आहे. ग्राम कृती दलासाठी विमा संरक्षण देण्याची मागणी संगमेश्वर ग्राम कृती दलातर्फे करण्यात येत आहे.
साहित्याचे वाटप
चिपळूण : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, विभागीय कार्यालय रत्नागिरीतर्फे अध्यक्ष आमदार शेखर निकम यांच्यामार्फत चिपळूणचे ग्रामदैवत श्री जुना कालभैरव देवस्थान ट्रस्ट यांच्या विद्यमाने सेवाभावी उपक्रम राबविण्यात आला. गरजू रुग्णांना मर्यादित कालावधीसाठी सेवा साहित्य पुरविण्यात येत आहे.
ग्राहक संकल्प अभियान
रत्नागिरी : महावितरणतर्फे ग्राहक संपर्क अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत कृषी थकबाकीदार ग्राहकांना एसएमएस व सोशल मीडियाद्वारे धोरणांची माहिती दिली जाणार आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून प्रत्यक्ष भेटून या धोरणात थकबाकी भरल्यास होणाऱ्या फायद्यांची माहिती दिली जाणार आहे.
मान्सूनपूर्व कामे सुरू
देवरुख : पावसाळा एका महिन्यावर आल्याने संगमेश्वर महावितरण शाखेने मान्सूनपूर्व कामाला प्रारंभ केला आहे. संगमेश्वर उपकेंद्र तसेच ११ व ३३ केव्ही वाहिन्यांची कामे पूर्णत्वास असून येत्या मे च्या शेवटपर्यंत सर्व कामे पूर्ण होणार असल्याची माहिती देण्यात आली.
ग्रामपंचायतीवर प्रशासक
दापोली : तालुक्यातील चार ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तालुक्यातील इनाम पांगरी, गावतळे, नवसे व फणसू या चार ग्रामपंचायतींची मुदत संपली असून, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे निवडणुका तूर्तास रद्द करण्यात आल्या असून, या ग्रामपंचायतीवर मुदत संपल्याने प्रशासक नियुक्त करण्यात आले आहेत.
मोफत डबा
दापोली : होम क्वारंटाईन असलेल्या तसेच कोरोना रुग्णालयात उपचार घेत असलेल्या गरजूंना एक वेळचा मोफत डबा देण्याचा उपक्रम कै. मामा महाजन प्रतिष्ठानतर्फे सुरू करण्यात आला आहे. गरजूंनी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. सेवाभावी बुद्धीने संस्थेतर्फे खारीचा वाटा यासाठी मोफत डबा उपक्रम सुरू केला आहे.
शेतकरी थकबाकीमुक्त
रत्नागिरी : कृषी ग्राहकांना वीज बिलातून थकबाकीमुक्त करण्यासाठी महावितरणकडून राबविण्यात येणाऱ्या महाकृषी ऊर्जा अभियानास सकारात्मक प्रतिसाद जिल्ह्यातून लाभत आहे. आतापर्यंत या थकबाकीमुक्ती योजनेत ८ लाख ६ हजार १०५ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला आहे.
पाण्याच्या पातळीत घट
रत्नागिरी : तीव्र उन्हाळ्यामुळे धरणातील पाणीसाठा खालावला आहे. पाटबंधारे गावाच्या तीन मध्यम प्रकल्प व ४६ लघु प्रकल्पांमध्ये गतवर्षीपेक्षा कमी पाणीसाठा आहे. या प्रकल्पावर अवलंबून असणाऱ्या शेतकरी नळपाणी योजनांना पावसाळ्यापर्यंत काटकसरीने वापर करावा लागणार आहे.