देवरुख : तब्बल ४८ तासानंतर फुणगुस खाडी पट्ट्यातील पुराचे पाणी नुकतेच ओसरले. मात्र, पुराच्या पाण्याचे प्रचंड प्रमाणात नासधूस आणि नुकसान झाले असून खाडी पट्ट्यात सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. तसेच दूध, पाव आणि पिण्याच्या पाण्याची गैरसोय झाली आहे.
पुरामुळे अनेक जण बेघर
खेड : मुसळधार पावसामुळे खेडमध्ये जगबुडी नदीला पूर आला आणि या पुरात होत्याचं नव्हतं झालं. या नदीच्या किनारी असणारी झोपडपट्टी पुराच्या पाण्यात वाहून गेली. या झोपडपट्टीतील सुमारे ५० हून लोक बेघर झाले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून या लोकांना एका शाळेत निवारा देण्यात आला आहे.
१० रुग्णवाहिका चिपळूणकडे रवाना
रत्नागिरी : चिपळूणवासीयांच्या मदतीसाठी जिल्हा परिषदेमध्ये उद्घाटनासाठी ठेवलेल्या १० रुग्णवाहिका चिपळूणकडे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार रवाना करण्यात आल्या आहेत. या रुग्णवाहिका परिषद भवनाच्या आवारात उद्घाटनाच्या प्रतीक्षेत होत्या.
अनेक गावांमध्ये साकव वाहून गेले
रत्नागिरी : जिल्ह्यात मुसळधार पावसाने हाहाकार उडविल्याने अनेक गावांमध्ये महापूर आल्याने मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. या महापुरासह डोंगरातून येणाऱ्या पावसाच्या पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे अनेक गावातील साकव वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत.
जिल्ह्यात सर्वत्र माणुसकीचे दर्शन
रत्नागिरी : चिपळूण, खेड तसेच जिल्ह्याच्या अन्य गावांमध्येही महापुराने थैमान घातले होते. त्यामुळे लोकांचे अन्न पाण्याशिवाय हाल झाले. या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक गावातून मदतीचा हात पुढे करण्यात येत आहे.